भेट आपली जगावेगळी
भेट आपली जगावेगळी
मुखावर होते थोडे, हास्य केविलवाणे
ओठांत माझ्या उरले काही, उदास सूर होते
का सार्या जगाला, ना उमगली आपली प्रीती
पाषाणहृदय की तयांचे, मन निष्ठुर होते
मीलनाचा मुहूर्त होता, आज आपण ठरवला
हृदयात या तुझ्या तृषेचे, उठले काहूर होते
आणावया धाडली मी तुजला, एक पालखी काजव्यांची
भेट आपली घडविण्या जणू, सारेच आतुर होते
कापलीस तू वाट इथवर जरी शेकडो मैलांची
ते शहर आपल्या स्वप्नांचे, अजूनही दूर होते
किती युगांनी पुन्हा आज पाहिले मी तुला
सांग सत्य हेच की, हे ही स्वप्न क्षणभंगुर होते
अखेरीस तुला भेटलो जेव्हा पहाटेच्या पूर्वप्रहरी
चक्षूंत आपल्या दोघांच्या, आसवांचे पूर होते
मीलनास आज आपल्या रात्र झाली काळोखी
अजूनही गगनात काही तारे फितूर होते