अंतर्मन
अंतर्मन


खूप काही दडलेलं असतं
सर्वांच्याच अंतर्मनात...
पण अंतरीचं सारं काही
नाही उतरवता येत पानांत...
मनातल्या तळाशी असतं
एखादं गूढ गुपित...
ओठांवर येत नाही कधी
अगदी असेना का मनमीत...
अथांग सागराचा तळ
या गूढ मनालाही असतो..
पापणींकडांवर आलेल्या लाटांना
ओठांचा किनारा लाभतो...
क्षितिजावरच्या आभाळालाही
आधार नसतो धरेचा
तिथं गेल्यावरच जाणवतं
तो फक्त भास असतो नजरेचा ...
अशा या गुजगोष्टी
मनातच विसावतात
एकांतात असताना मात्र
नकळत वाहून जातात...
ही कोणा एकाची नव्हे तर
सर्वांचीच आहे कहाणी
म्हणून तर मनासोबतच दिलंय
गहिऱ्या नयनांमध्ये पाणी...