अंधश्रद्धेने फसू नको
अंधश्रद्धेने फसू नको
1 min
17K
अंधपणाने कधी कुणाच्या
विश्वासावर बसू नको
डोळे उघडे ठेव माणसा
जीवनात या फसू नको ।।१।।
बुवा येऊनि दुवा द्यायची
वाट कधी तू बघू नको
नवसाने का मूल होतसे
खोटी आशा धरू नको ।।२।।
देव शोधण्या मंदिर मस्जिद
तीर्थस्थाने फिरू नको
जिते जागते देव भोवती
निंदा त्यांची करू नको ।।३।।
दगडाला शेंदूर फासूनि
देव तयाला म्हणू नको
भोंदूच्या ढोंगास भूलोनि
मूर्ख कधीही बनू नको ।।४।।
विज्ञानाची कास धरावी
चौकस बुद्धी सोडु नको
बुद्धीची श्रद्धेस जोड दे
अंधपणे बाळगू नको ।।५।।
तुझ्या अंतरी देव बैसला
कधी तयाला विसरु नको
अंतरीच्या शक्तीस जागवी
हीन जगी या ठरू नको।।६।।
