अमलात आणा सावरकर
अमलात आणा सावरकर
ध्यास एक स्वातंत्र्याचा
आजन्म उरी बाळगला
भारतभूच्या प्रेमासाठी
सावरकरांनी देह झिजवला
ध्येयवेडे आपणही त्यांच्यासारखे होऊया
सावरकरांच्या विचारांना अमलात आपण आणूया।।
होळी विदेशी मालाची
चपराक दिली सरकारला
मोल स्वदेशी वस्तूंचे
समजावले जनतेला
स्वदेशी वस्तूंचा स्विकार आता आपण करूया
सावरकरांच्या विचारांना अमलात आपण आणूया।।
जन्मठेप पन्नास वर्षांची
शिक्षा झाली काळ्या पाण्याची
बंदिवान अंधाराचा असूनही
रचना केली महाकाव्याची
परिस्थितीला झुकवण्याचे सामर्थ्य अंगी बाणवूया
सावरकरांच्या विचारांना अमलात आपण आणूया।।
मातृभूमीच्या भेटीसाठी
प्राण किती तो तळमळला
कुशीत तिच्या निजण्यासाठी
जीव काकुळतीस आला
मातृभूमीचे प्रेम असे हृदयी आपल्या जपूया
सावरकरांच्या विचारांना अमलात आपण आणूया।।