आनंदकंद
आनंदकंद
1 min
13.8K
शब्दातल्या कळ्यांनी गझलेत या फुलावे
हृदयात मैफिलीच्या भावार्थ दरवळावे
संवेदना मनाची होईल मग सुगंधी
जे गोठले कधीचे काळीज कळवळावे
मी वाटतो सुखाला अन् मांडतो व्यथेला
उन्मेष भावनांचे रक्तात सळसळावे
मी स्वैर हिंडणारा निर्धास्त सा खलाशी
माणूस शोधण्याला आयुष्य तळमळावे
मी उलगडीत जावे सौंदर्य जीवनाचे
घायाळ रसिकतेने बेधुंद खळखळावे
पाहीन मी जगाला उघडून आत्मचक्षू
जे चांगले जगी ते काव्यातुनी खुलावे
