आई
आई
साडी घेईल, दिवाळीला,
समीला लंगापोलक,
नामुला ये घेऊन,
भागे तू ये, माहेराला
लई दिस झालं,
पाहिलं नाही, तुला
गाय येली ढवळी,
कारवड लई गॉड हाय,
खरुज खातील,
समी नाम्या,
भागे तू ये, माहेराला
सिंदफणाचा पूर,
ओसरुन गेलाय सारा,
मुक्कामी एसटी,
सुरु झाली आता,
आठ दिस राहा,
भागे तू ये, माहेराला
तुऱ्याला गवत, आलंय,
गुर डोरं गॉड हाईत,
दुध तापतंय भगुलंभर,
साई येती ओंजळभर,
भागे तू ये, माहेराला
मुग उडीद झालेत आता,
सोनं घेईल थोडं,
उरले पैसं काही तर,
करील तुला तोडं,
भागे तू ये, माहेराला
येवडा निरुप सांग धोंडे,
बाजारात पडली गाठ,
लई वाट पाहाती म्हणावा,
भागी तुझी आय,
डोळ्यात पाणी आणलं तिनं
अन म्हणाली,
भागे तू ये, माहेराला