आभास तुझा...
आभास तुझा...


आज पुन्हा एकदा तुला
स्वप्नात पाहिले...
नाहीस तू... आभास सारे...
हासू ओठांवर थिजले थिजले...
आज मनात भरुन उरलंय एक तुफान,
विरहाचं वादळ काही शमेना...
कुठुन येतो एवढा जोर तुझ्या आठवणींना
त्यांना थोपवणं मला काही केल्या जमेना...
विरहाची वादळे आता, मनातच शमली आहेत...
तुझ्या वावराच्या राज्यात,
तेवढ्यापुरतीच रमली आहेत...
ओल्या पापण्यांत माझ्या,
असंख्य दुःखे ,
कोणा ना समजलेली...
बोलूनही व्याकुळतेने,
तुला ना समजलेली...
जीव जडल्या भेटींना
नयनांत साठवतो...
हरवू नये म्हणून
आसवांना थांबवतो...
असा का जीव जडतो
असाच का वेडावतो...
आठवांच्या सावल्यांना
उराशी कवटाळतो...
दूर जाणाऱ्या तुझ्या डोळ्यात,
मी माझ्यापासुनच दुरावत होतो...
तुझ्यातून विलग होऊन,
पुन्हा तुझ्यातच हरवत होतो...
तुझ्याशिवाय जगणं तर सोडच,
मरणंसुद्धा कठीण आहे...
उरलेल्या प्रत्येक श्वासात,
आता अखंड जळणं आहे...
पेटत्या श्वासांना आवरु कसा...
तुझ्याविना वाराही वेडापिसा...
रिकाम्या आभाळी नयन लागले...
रुणझुणत्या पाखरा सावरु कसा...
अस्वस्थ करणारी आठवण तुझी,
विरहाचे क्षण वर्ष सरेना...
प्रिये तू ये ना...
तोडून टाक बंध मनीचे,
उधळू दे भाव सारे,
मिठीत मज घे ना...
शापीत तो चंद्रमा
पूर्णत्वासाठी त्रासलेला...
मीदेखील तसाच,
अधुरा तुझ्याविना,
विरहाच्या भयानं अंधाराने ग्रासलेला...