शिल्पा म. वाघमारे

Others

2  

शिल्पा म. वाघमारे

Others

उंबरठ्याबाहेर

उंबरठ्याबाहेर

1 min
472


ओलांडून उंबरठा ये बाहेरी

सखे मुक्ताकाशी घे झेप

मळभ सार सारे अंतरीचे

पुनः नोहे ही संधीची खेप ||१||


हाक ऐक सखे अंतरीची

बंधने व्यर्थ ती सारी तोड

खुणावती तुज सुवर्णसंधी

का ही आयुष्याशी तडजोड?||२||


पुरुषप्रधान संस्कृतीला

लादून ते मोकळे झाले

तुझे कोंडलेले श्वास ते

कधी कुणा का जाणवले? ||३||


उंबरठ्याच्या बाहेर ये तू

ओलांडून निर्बंधांचे माप

मागे वळुन पाहु नकोस

हात रोखणारे जरी अमाप ||४||


गृहपंजरीचा झालीस रावा

परंपरा युगांची तोड सखी

कोमलतेस कमजोरी ठरवून

विषप्यालाच तुज दिला मुखी ||५||


त्या चार भिंतींना तू ही

मानून बसलीस विश्व खरे

मुकलीस ना गं मुक्तजीवना

तन-मन-धन अर्पूनही सारे ||६||


तप्तलोहगोलास्त्र भिरकाव ज्ञानाचे

थरथरू दे मातल्या काळोखास

सडेतोड कर प्रहार त्या तमी

चेतव स्वतःप्रत अटळ विश्वास ||७||


माळून विजा वेणीत सये

घे परखड विचारलेखणी

दुरितास लयाला तूच नेशी

जागव आतली रणरागिणी ||८||


त्या क्षितीजाच्या पल्याडही

तु झेप अशी घे खरोखरी

बनव तुझा तू मार्ग असा की

करू शकेल ना कुणी बरोबरी||९||


इतिहास घडवण्यास सोनेरी

क्रांतीज्योती तुझ्यातच 'साऊ'

घडवण्यास शिवबा उद्याचा

तूच दैदिप्यमान सक्षम जिजाऊ ||१०||


Rate this content
Log in