सांज सावळी
सांज सावळी
1 min
162
दिनरातीच्या सीमेवर ते
नभोमंडली झगमग उठते
सायंतारा अस्ता जाता
सांज सावळी दाटुन येते
सांज सावळी दाटुन येते
राधा रमणी सुधबुध हरते
वाऱ्यासंगे मंद बासरी
चित्ताला या धुंदित करते
मुग्ध राधेस कान्हा छेडी
येता जाता काढी खोडी
सांज सावळी दाटुन येता
लावे तिजला लाडीगोडी
रुसून बसती होत बावरी
दिसता पावा मना सावरी
सांज सावळी दाटुन येता
आळविते ती कृष्ण मुरारी
सांज सावळी दाटुन येते
मोरपिसाने तन हुळहुळते
साद घालितो सावळा हरी
हरखत राधा लज्जित होते
सांज सावळी दाटुन येते
मोहन मुरली ताना घेते
पाहुनि येता राधाकृष्णा
अवघे गोकुळ गंधित होते