ABHAY BAPAT

Crime Others

4.6  

ABHAY BAPAT

Crime Others

दॅट्स ऑल युअर ऑनर (प्रकरण ११)

दॅट्स ऑल युअर ऑनर (प्रकरण ११)

12 mins
664



प्रकरण अकरा.

 

दोन ला पाच मिनिटे असताना पाणिनी कोर्टात प्रवेश करत असतानाच ओजस ने त्याच्या खांद्याला हात लावून लक्ष वेधून घेतले. “ पाणिनी, रात्री नऊ नंतर पोलीस प्रभाकर लघाटे ने रात्री बारा नंतर घरी जाण्या पूर्वी आणखी समन्स का लावला नाही गाडीला याची तू चौकशी करायला सांगितली होतीस. मी केली. त्याने खरोखर एकदाच समन्स लावला होता , त्या नंतर आलेल्या पोलिसाने दोन लावले.असे तीन समन्स लागल्यामुळे गाडी उचलून नेली गेली. आधी पोलिसांनी या घटनेकडे फार लक्ष नाही दिले पण नंतर जेव्हा समजले की या गाडीचा खुनाशी संबंध आहे, तेव्हा मोठा गहजब झाला.पोलिसांनी आता त्या गाडीवरचे बरेचसे ठसे घेतलेत.”

 

पाणिनी ने डोळे मिटून ओजस ने दिलेली माहिती पचवली.

 

 “ तुला कितपत मोठा धक्का आहे हा? ” ओजस ने विचारले.

 

“ मला नाही सांगता येणार आत्ताच. काय काय घडतं पुढे बघू.”

 

पाणिनी पटवर्धन कोर्टात न्यायाधीशांसमोर उभा राहिला.

 

“ पोलिसांनी दिलेली गाडीच्या पार्किंग बद्दल ची साक्ष स्वीकारावी असे मला सांगण्यात आले होते आणि मी ती स्वीकारली होती. वेळ वाचवण्याचे दृष्टीने मी कोणतीही साक्ष स्वीकारण्यास नेहेमीच तयार असतो अर्थात जर माझ्या अशिलाच्या हिताच्या आड ते येत नसेल तर. प्रभाकर लघाटे ची साक्ष मी स्वीकारलीच आहे पण मला त्याची उलट तपासणी घ्यायची आहे.माझ्या अशिलाच्या हितासाठी ते गरजेचे आहे असे माझे मत आहे.”

 

“ ठीक आहे.देतो परवानगी ” न्यायाधीश कार्तिक भाटवडेकर म्हणाले. “ पण मला नाही वाटत त्यातून फारसे काही निष्पन्न होईल.”

 

दैविक दयाळ उठून उभा रहात नाटकी पणाने सभ्यतेचा आव आणत म्हणाला,

 

“न्यायमूर्ती महाराज काय म्हणतात याच्याशी मी सहमत आहे.पण आता असे जाणवतं की त्याची उलट तपासणी ही खटल्याचा बराचसा वेळ घेईल,मी पटवर्धन ना त्याची साक्ष स्वीकारण्याची केलेली विनंतीच मागे घेतो. त्याची साक्षच आम्ही गृहित धरत नाही.”

 

“ म्हणजे जणू काही प्रभाकर लघाटे हा तुमचा साक्षीदार नव्हताच असे तुम्ही समजणार?”

 

कार्तिक भाटवडेकर नी विचारले.

 

“ हो तसेच ! दैविक म्हणाला.”

 

“ अशा या प्रकाराला आमचा विरोध आहे.त्याची साक्ष काय असेल ते सरकारी वकिलांनी सांगितले आणि मी मान्य केले, म्हणजे प्रत्यक्ष त्याची साक्ष घेतली न जाता.पण ते केवळ वेळ वाचवण्यासाठी.प्रभाकर लघाटे कोर्टात हजर आहे आणि उलट तपासणी चा मला अधिकार आहे. त्याची झालेली साक्ष अशी रद्द नाही करता येणार. ” पाणिनी ने हरकत घेतली.

 

 न्यायाधीश म्हणाले, “ सरकार पक्षाने आपला हा साक्षीदारच रद्द केलाय. मग उलट तपासणी कोणाची घेणार?”

 

“ त्याची साक्ष मी प्रत्यक्ष न घेता तो काय बोलणार आहे ते सरकार पक्षाने सांगितले आणि मी ते मान्य करावे अशी सरकार पक्षाचीच विनंती होती.मी न्यायालयाचा वेळ वाचवा म्हणून ती मान्य केली पण माझा उलट तपासणीचा अधिकार अबाधित ठेऊन. त्यामुळे माझा हक्क कोर्ट हिरावून घेऊ शकत नाही.”

 

कार्तिक भाटवडेकर हसले. “ मला वाटते पटवर्धन बरोबर आहेत. सरकार पक्षानेच सांगितले म्हणून पटवर्धन ने प्रस्ताव स्वीकारला.सरकारी वकीलांना आता त्यांचा निर्णय फिरवता नाही येणार.प्रभाकर लघाटे ला बोलवा.”

 

       “ मला नाही वाटत त्याला एवढया कमी वेळेत हजर करता येईल.” दैविक दयाळ म्हणाला.

 

“ त्याला तुम्ही कोर्टातून बाहेर जाऊ द्यायलाच नको होते. पटवर्धन ने उलट तपासणी घेण्याचे अटीवरच तुमचा प्रस्ताव मान्य केला होता. ” कार्तिक भाटवडेकर म्हणाले.

 

“ मला अजिबात अंदाज नाही आला की पटवर्धन उलट तपासणी घेतील.” दैविक म्हणाला.

 

“ तुमचा अंदाज चुकला.पण आता व्यवस्था करा.दरम्यान तुमचा दुसरा साक्षीदार बोलवा. कोण असणार आहे ? ”

 

“इन्स्पेक्टर तारकरना बोलवायचे आहे.” दैविक म्हणाला.

 

इन्स्पेक्टर तारकरने येऊन शपथ घेतल्यावर दैविक ने प्रश्नांना सुरुवात केली.

 

“ तुम्हाला कंपनीच्या आऊट हाऊस वर सहा तारखेला बोलावण्यात आलं होत आणि तिथे तुम्हाला तपन चे प्रेत दिसले ? ”

 

“ नाही. मी तिथे जाण्यापूर्वी ते हलवण्यात आले होते.”

 

“ परंतू, त्याच्यावर अंत्यविधी होण्यापूर्वी त्याचे कपडे तपासण्यात आले तेव्हा तुम्ही हजर होता? ”

 

“ होतो.” इन्स्पेक्टर तारकर म्हणाला.

 

“ काही विशेष असे सापडले का त्याच्या कपड्यात ? ”

 

“ गाडीतल्या इंजिन मधील एक इलेक्ट्रिक भाग.”

 

“ तुमच्याकडे आहे का तो अत्ता? असेल तर तो कोर्टाच्या ताब्यात द्या पुरावा म्हणून.” दैविक दयाळ म्हणाला.

 

इन्स्पेक्टर तारकरने आपल्या कडील भाग कोर्टाच्या लेखानिकाकडे दिला.त्याने तो नोंदवून पटवर्धन कडे बघायला दिला.

 

“ या भागाचे कार्य काय असते गाडीमध्ये?

 

“ गाडीच्या विविध भागात जिथे विद्युत प्रवाह आवश्यक असतो तिथे तो पोचवणे.”

 

“ आणि हा भाग नसेल तर काय होईल?”

 

“ मोटार चालूच होणार नाही कारण ठिणगी पडणार नाही ”

 

“ आणि हा भाग त्याच्या खिशात होता? ”

 

“ हो सर.” इन्स्पेक्टर तारकर म्हणाला.

 

“ आरोपीची गाडी तुमच्या परिचयाची आहे? ”

 

“ आहे.”

 

“ मग मला सांगा की हा जो पार्ट आहे तो आरोपीच्या गाडीत इंजीन मधे बरोब्बर बसतो की नाही ? ”

 

“ बसतो.”

 

दैविक कोर्टाला उद्देशून म्हणाला, “ मी आता जे पश्न इन्स्पेक्टर तारकरना विचारणार आहे, त्याला ‘ऐकीव माहिती’ या निकषाखाली आरोपीचे वकील हरकत घेऊ शकतात.पण कोर्टासमोर पूर्णपणे चित्र स्पष्ट होण्याचे दृष्टीने आणि वेळ वाचवण्याचे हेतूने मी ते विचारणार आहे.त्याला पटवर्धन ने हरकत घेतली तर मला नाईलाजाने संबंधित मेकॅनिक ला साक्षीला बोलवावे लागेल आणि त्यात जास्त वेळ जाईल. ”

 

“ मला सांगा की आरोपीची गाडी पाच तारखेला रात्री चालू अवस्थेत होती की नाही याची माहिती तुम्ही घेतली का? काय आढळलं तुम्हाला? ” पटवर्धन ची संमती गृहित धरून दैविक ने इन्स्पेक्टर तारकरला विचारले.

 

“ पाच तारखेला रात्री तिची गाडी पूर्ण रात्रभर ,अगदी सहा तारखेला सकाळ पर्यंत कंपनीच्या पार्किंग मधे होती.सहा तारखेला मेकॅनिक आला आणि त्याने गाडी दुरुस्त करून दिली.” इन्स्पेक्टर तारकर म्हणाला.

 

“मेकॅनिक ने काय सांगितले? ”

 

“ तो म्हणाला अत्ता कोर्टाला मी जो पार्ट दाखवला, तो त्या गाडीत नव्हता.”

 

“ तोच पार्ट ? ”

 

“ तो किंवा अगदी तसाच हुबेहूब ”

 

“ मी कोर्टाला विनंती करतो की या पार्ट ला योग्य क्रमांक देऊन पुरावा म्हणून घेण्यात यावा.”

 

“ ब ७ असा अनुक्रमांक त्याला दिला आहे.” कोर्टाच्या लेखनिकाने सांगितले.

 

“ पाच तारखेला आरोपीच्या ठाव ठिकाण काय होता या बद्दल तुम्ही तिला प्रश्न विचारलेत का? आणि ते कधी विचारलेत? ”

 

“ सात तारखेला, जेव्हा तिला पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा.”

 

“ आणखी कोणी तुमच्या बरोबर उपस्थित होता तेव्हा ? ”

 

“ एक पोलीस होता. ”

 

“ तिला तुम्ही काही आमिष दाखवले होते? दम दिला होता? ”

 

“ बिलकुल नाही.”

 

“ तिला तिच्या अधिकाराची जाणीव करून दिली होती? की तिने कोणतीही कबुली देणे सक्तीचे नाही ”

 

“ तिला मी सांगितले होते की कोणतेही विधान तू करशील ते काळजीपूर्वक कर,त्याचा उपयोग तुझ्या विरुद्ध केला जाऊ शकतो. तिला मी हे पण विचारले की पाच तारखेला रात्री तू कुठे होतीस ? तपन बरोबर होतीस का? ”

 

“ त्यावर तिने काय उत्तर दिले? ” दैविक ने विचारले.

 

“ तिने सांगितले की कंपनी तून घरी निघताना गाडी सुरु झाली नाही. तपन ने दुरुस्तीचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही.त्याने मला लिफ्ट दिली.मला घरी सोडण्यापूर्वी मला घेऊन तो कामासाठी म्हणून ऑफिस च्या आऊट हाऊस मधे गेला.तिथे संबंधित माणसाची वाट बघण्यात खूप वेळ गेला , आम्ही तिथे बिस्किटे,आम्लेट आणि मटण बनवले.तेथे त्याने अति प्रसंग केला.त्याच्या तावडीतून मी निसटले आणि अंधारात त्याची नजर चुकवत रस्त्यावर आले.तो गाडी घेऊन मला शोधत आला. मी काटेरी तारेच्या कुंपणा खालून सरपटत गेले. माझे बुटाचे ठसे शोधत तो गाडीतून खाली उतरून आला. मी त्याची नजर चुकवून त्याच्या गाडीत शिरले आणि तो मला पकडायला येण्या आधीच गाडी सुरु करून शहरात आले.त्याच्याच इमारतीसमोर असलेल्या अग्नी शमन यंत्राच्या खांबा समोर मी त्याची गाडी लावली , मुद्दामच, त्याला त्रास व्हावा म्हणून, आणि सरळ माझ्या घरी आले. ” इन्स्पेक्टर तारकरने सविस्तर सांगितले.

 

“  तेव्हा किती वाजले होते या बद्दल तिने काय सांगितले? ”

 

“ ती म्हणाली रात्री सव्वा आठ ते साडेआठ. वाजले होते तेव्हा.”

 

“ तिने किल्ल्या गाडीतच ठेवल्या होत्या? ”

 

“ हो . गाडीतच होत्या.”

 

 “ पुन्हा आपण आधीच्या घटनेकडे जाऊया. तिने तुम्हाला सांगितले की तपन ने मटण आणि अंडी आम्लेट बनवले म्हणून?”

 

“ हो ”

 

“ तिने असे सांगितले का की त्या मटणआणि आम्लेट पैकी त्यांनी थोडे अन्न खाल्ले म्हणून? ”

 

“ तिने सांगितले की तिच्यावर त्याने हल्ला केला त्यामुळे खाण्यापूर्वीच ती बाहेर पळाली.

 

“ तिने जे जे सांगितले त्याची शहानिशा करण्यासाठी तुम्ही काय केले? ”

 

“ सर्वात प्रथम तपन च्या गाडी ची हातचे ठसे मिळण्याचे दृष्टीने तपासणी केली.आरशाच्या मागील बाजूस काही ठसे मिळालेत.ती आऊट हाऊस मधून बाहेर पडल्यावर ज्या रस्त्यावरून गेली, त्यावर तिच्या पावलांचे ठसे मिळतात का हे पाहण्यासाठी त्याची तपासणी केली. पण त्यात यश आले नाही कारण त्या रस्त्यावर इतक्या लोकांच्या बुटाचे ठसे होते की त्यातून आरोपीचे ठसे शोधणे शक्यच नव्हते. या प्रकरणात मोठ्या कुटुंबातील माणसाचा बळी गेल्यामुळे,प्रसिध्दी फार मिळाली त्यामुळे.खूप लोक त्या आऊट हाऊस जवळ आले होते.”

 

“ मुख्य रस्ता सोडून जो आड रस्ता आहे त्या ठिकाणच्या परिसरात काय आढळलं ?  म्हणजे त्या टेकडीच्या उताराला? ”

 

इन्स्पेक्टर तारकर या प्रश्नाची आतुरतेने वाट बघत होता.परंतू उत्तर देताना फार उत्तेजित झाल्या सारखे न दाखवता तो म्हणाला “  आरोपीने त्या ठिकाणी जाणून बुजून काही पुरावा निर्माण केल्याचे आढळले. ”

 

न्यायाधीशांनी चमकून त्याच्याकडे पहिले.नंतर पटवर्धन कडे आणि दैविक कडे .

 

“  बचाव पक्ष म्हणून पटवर्धन तुम्हाला ,या प्रश्नावर हरकत घ्यायची आहे का? किंवा हे उत्तर म्हणजे साक्षीदाराने काढलेला निष्कर्ष आहे या मुद्द्यावर त्याचे उत्तर मान्य करू नये अशी तुमची मागणी आहे का मिस्टर पटवर्धन? ” कार्तिक भाटवडेकर यांनी पटवर्धन ला सुचवण्याचा प्रयत्न केला.

 

“ हरकत घ्यायच्या ऐवजी मला या मुद्द्यावर इन्स्पेक्टर तारकरची उलट तपासणी घ्यायची आहे. ”  पाणिनी पटवर्धन म्हणाला.

 

“ असं असेल तर अशा अप्रस्तुत गोष्टी खटल्यात आणल्या जात असताना उलट तपासणीच्या प्रतीक्षेत गप्प बसून राहणे बरोबर नाही पटवर्धन.” न्यायाधीश कार्तिक भाटवडेकर म्हणाले.

 

“ मला यात अप्रस्तुत वाटत नाही.जर आरोपीने खरोखर असा काही पुरावा त्या ठिकाणी निर्माण केला असेल तर ती फार महत्वाची आणि न पटणारी गोष्ट आहे.” पाणिनी म्हणाला.

 

“ पण या साक्षीदाराला हे माहिती नाहीये की आरोपीनेच तो पुरावा निर्माण केला म्हणून. तुमचे काम आहे यावर हरकत नोंदवण्याचे आणि त्याचे उत्तर मान्य न करण्याची कोर्टाला विनंती करण्याचे.” कार्तिक भाटवडेकर म्हणाले.

 

“ कोर्टाला मी विनम्र पणे सांगू इच्छितो,’’ दैविक नाटकी पणाने म्हणाला.  “ की या साक्षीदाराला हे माहित आहे परिस्थितीजन्य पुरावा बोलका आहे. पटवर्धन ने उलट तपासणी घेतली तर साक्षीदार आणि सरकार पक्ष त्याचे स्वागतच करेल.”

 

“ वकिलांनी आपला खटला कसा चालवायचा हे त्यांचे त्यांनी ठरवायचे आहे.पण मी मात्र या मताचा आहे की साक्षीदाराने हे विधान त्याचा निष्कर्ष म्हणून केले आहे. ज्यावर पटवर्धन ना हरकत नोंदवण्याचा अधिकार आहे. ” न्यायाधीश कार्तिक भाटवडेकर म्हणाले.

 

“ इन्स्पे. तारकरचा या क्षेत्रातला अनुभव आणि त्याने घेतलेले प्रशिक्षण आणि अनुमान काढण्याची हातोटी पाहता तो तज्ज्ञ समजला जातो आणि त्यामुळे आमचा बचाव पक्ष त्याने केलेल्या विधानावर काहीही आक्षेप घेऊ इच्छित नाही.” पाणिनी ने जाहीर करून टाकले. ”

 

दैविक दयाळ खुष होवून झपकन इन्स्पेक्टर तारकरकडे वळला.  “ काय आढळले तुम्हाला त्या जागी ? ”

 

सात तारखेला आरोपीला प्रश्न विचारण्यापूर्वी आम्हाला असं आढळलं की कोणीतरी आरोपीच्या ड्रेस चा एक तुकडा चाकूने कापला होता.हा तुकडा नंतर त्या काटेरी कुंपणाला अशा तऱ्हेने अडकवलेला होता ही कोणाचेही सहज लक्ष जाईल.एक उंच टाचांचे बूट घातलेल्या स्त्री ला कोणीतरी उचलून कुंपणाच्या पलीकडील मऊ माती असलेल्या जमीनीवर सोडल्याच्या खुणा सापडल्या. कोणीतरी कुंपणा खालून सरपटत पलीकडे गेल्याचा भास निर्माण करण्याचा तो प्रयत्न होता.” इन्स्पे. तारकरम्हणाला.

 

“ तुम्ही हे खात्रीने सांगू शकता का , की ज्या व्यक्तीच्या बुटांचे हे ठसे होते ,ती व्यक्ती कुंपणा खालून सरपटत पलीकडे गेली नाही म्हणून . ”

 

“ शंभर टक्के खात्री देवू शकतो. ” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला.

 

“ कशावरून ? ”

 

“ कुंपणाच्या मागील बाजूची जमीन बुटांचे ठसे टिकण्याच्या दृष्टीने मऊ होती.पण कुंपणाच्या दुसऱ्या बाजूला मात्र ठसे नव्हते.”

 

“ ज्या ड्रेस चा तुकडा तारेत अडकवलेला आढळला,तो ड्रेस नंतर तुम्हाला मिळाला का ? आणि कुठे? ”

 

“ तो आरोपीच्याच घरात अशा तऱ्हेने ठेवलेला मिळाला की कोणालाही तो सहज दिसावा.”

 

“ तो ड्रेस अत्ता आहे का तुमच्याकडे? असेल तर सदर करा.”

 

इन्स्पेक्टर तारकरने आपल्या बॅगेतून तो काढला आणि सादर केला. तो तोच ड्रेस होता जो ने पाणिनी च्या बरोबर आकृती च्या घरी जाताना घातला होता.

 

“ फाडलेला तुकडा तुम्ही आणलाय का तुमच्या बरोबर? ”

 

इन्स्पेक्टर तारकरने तो दाखवला.

 

“ हा तुकडा त्या ड्रेस ला फाडलेल्या ठिकाणी जोडून पहिला तर तंतोतंत जुळतोय का? ”

 

“ अगदी बरोबर जुळतो.”

 

“ कोर्टाला जरा दाखवा कसा जुळतो ते. ”

 

इन्स्पेक्टर तारकरने तो दाखवला.

 

न्यायाधीश कार्तिक भाटवडेकर यांच्या कपाळाला आठ्या पडल्या.त्यांनी पटवर्धन कडे प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले.त्यांनी स्वतः तो तुकडा पुन्हा नीट जुळवून पहिला.

 

“ हा तुकडा आणि मूळ ड्रेस पुरावा म्हणून मी कोर्टात जमा करू इच्छितो.” दैविक दयाळ म्हणाला. “ ड्रेस ला ब ८ आणि तुकड्याला ब ९ असे क्रमांक राहतील.”

 

“  त्या पूर्वी बचाव पक्षाला या विषयावर साक्षीदाराची तपासणी करण्याचा अधिकार आहे.पटवर्धन तुम्ही घेऊ इच्छिता ? ”

 

“ हो घ्यायचीच आहे मला ” पाणिनी पटवर्धन म्हणाला.

 

“ परवानगी आहे.”

 

पाणिनी उठून उभा राहिला. इन्स्पेक्टर तारकरकडे बघून हसला. “ तू म्हणालास की आरोपीने सांगितलेली हकीगत खरी वाटावी म्हणून पुरावा निर्माण केलं गेला?”

 

“ दुसरा काहीच असू शकत नाही याचा खुलासा.”

 

“ तर मग असा पुरावा फारच कमकुवत आहे.” पाणिनी म्हणाला.

 

“ ज्या व्यक्तीने आरोपी ला मदत करण्यासाठी पुरावा निर्माण करायचा प्रयत्न केला ती व्यक्ती उंच टाचांचे बूट घातलेली तरुणी असली पाहिजे, आणि ती कुंपणाच्या पलीकडच्या बाजूने मऊ माती असलेल्या जमिनीवरून पळत गेली असली पाहिजे.” पाणिनी म्हणाला.

 

“ तेवढा वेळ त्या व्यक्तीला मिळाला नसेल.”

 

“ आणि तू असे सांगितलेस की कापडाचा तुकडा ज्या ड्रेस चा होता,तो ड्रेस आरोपीचा होता.” पाणिनी ने विचारले.

 

“ तो ड्रेस तिच्याच मापाचा होता.आणि तिच्याच घरात सापडला एवढी गोष्ट तिची मालकी सिध्द व्हायला पुरेशी आहे.” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला.

 

“ तो ड्रेस आरोपीने खरेदी केला आहे का हे शोधून काढायचा तू प्रयत्न केलंस का? ” पाणिनी ने विचारले.

 

“ नाही केला प्रयत्न . मला नाही वाटत त्याची गरज होती.”

 

“ त्या ड्रेस वरचे लॉण्ड्री च्या खुणा तपासल्या का? त्यावरून मालकी शोधायचा प्रयत्न केला का ? ”

 

“ अजून नाही केला तसा प्रयत्न ” .” इन्स्पेक्टर तारकरने कबुली दिली.

 

“ तरीही तू साक्षीत सांगितलेस की तो ड्रेस तिच्याच मालकीचा होता ? ”

 

“तो ड्रेस तिच्याच मापाचा होता.आणि तिच्याच घरात सापडला एवढी गोष्ट तिची मालकी सिध्द व्हायला पुरेशी आहे.” इन्स्पेक्टर तारकर पुन्हा म्हणाला ”

 

“ आणि तू सांगितलेस की त्या ड्रेस चा तुकडा काटेरी कुंपणावर अडकलेला तुला आढळला आणि त्यामुळे पुढे जमिनीवरील ठशांचा मागोवा घेण्यात आला ? ”

 

“ बरोबर ”

 

“ आणि तो मागोवा घेत असताना तू अशा निष्कर्षाप्रत पोचलास की कोणीतरी वेगळा पुरावा निर्माण करून आरोपीच्या म्हणण्याला पुष्टी देण्याचा प्रयत्न करत आहे.” पाणिनी म्हणाला.

 

“ याचे उत्तर देणे म्हणजे माझा निष्कर्ष आहे असा अर्थ होईल पण मी देतो उत्तर.” इन्स्पेक्टर तारकर म्हणाला “ माझे मत आहे की आरोपीनेच तपन ला मारला.तिला त्या वाचून कदाचित इलाज नसेल पण वस्तुस्थिती सांगायच्या ऐवजी तिने कुंपणाच्या खालून घसरत गेल्याचे कुभांड रचले आणि ते खरे आहे असे भासवण्यासाठी ड्रेस चा तुकडा फाडून तारेला अडकवला.”

 

“ हे उत्तर म्हणजे साक्षीदाराने पाहिलेली घटना नाही . त्याने केलेला अंदाज किंवा निष्कर्ष आहे.” कार्तिक भाटवडेकर म्हणाले.

 

दैविक दयाळ त्याच्या मदतीला धावला. “ त्याचे मत हे तज्ज्ञ म्हणून आहे. हे गृहीत धरूनच प्रश्न विचारला गेला होता आणि त्याला प्रतिसाद म्हणून साक्षीदाराने हे उत्तर दिले आहे.”

 

“ जो पुरावा मिळाला तुला ,त्यावरून ,ज्या ठिकाणी कापडाचा तुकडा मिळाला त्याच्या आसपासचा परिसर तपासायला तुला भाग पडले.? ”

 

 साक्षीदार अस्वस्थ पणे चुळबुळला. “ वस्तुस्थिती आहे तशी ” तो म्हणाला.

 

“ तो तुकडा जर त्या तारेला अडकलेला सापडला नसता तर आसपासचा परिसर तू तपासाला नसतास.”

 

“ काहीही घडू शकले असते पटवर्धन.” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला.

 

“ आणि तू आसपासच्या परिसराची जी पाहणी केलीस त्यातून मिळालेल्या माहिती वरून आरोपीने सांगितलेली हकीगत खरी असल्याचे च पुरावे मिळाले?” पाणिनी ने विचारले.

 

“  तिथे पावलांच्या खुणा मिळाल्या .पण त्या मुद्दाम निर्माण केलेल्या खोट्या पुराव्याच्या होत्या.” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला

 

“ कशावरून ? ”

 

आसपासची जमीन तीन प्रकारची होती. एक प्रकार म्हणजे मातीचा कच्चा रस्ता.ज्यावर पाउस पाडला होता.आणि त्यावर पावलांच्या खुणा होत्या ,त्या कदाचित पाच तारखेला उमटल्या असतील पण त्या , नंतर च्या पावसाने पुसल्या गेल्या असाव्यात.त्यामुळे सहा किंवा सात तारखेला त्या दिसतं नव्हत्या.दुसरा प्रकार होता तो रस्त्याच्या लागत असलेली मऊ सर माती.त्यावर खळगे होते ज्यात रस्त्यावरचे पाणी वाहत येत होते. त्यामुळे ती माती बऱ्यापैकी कालावधीसाठी मऊ राहिली.हीच परिस्थिती रस्त्याच्या पश्चिमेकडील टेकडी लगतच्या उतारावरील मातीची होती. कुंपणाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या पश्चिमेकडे तिसऱ्या प्रकारची जमीन होती.यावर गवत आणि रान उगवले होते . त्यामुळे यावर उमटलेल्या कोणत्याही खुणा दिसूच शकत नाहीत तरी सुद्धा उंच टाचांच्या काही खुणा इकडे तिकडे दिसतं होत्या पण त्या इतक्या स्पष्ट नव्हत्या की त्यातून काही ठोस असे शोधता येईल. पण आम्हाला माहित्ये की या खुणा नंतर पडल्या गेल्या आहेत कारण कुंपणाच्या पलीकडील सर्वात जवळची खूण ही, ड्रेस च्या तुकड्या पासून सत्तावीस फुट अंतरावर होती ” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला

 

“ तारेला जर कापडाचा तुकडा अडकला नसता तर या सगळ्या खुणांकडे दुर्लक्षच झाले असते? ”

 

“ मी नाही सांगू शकत त्या बद्दल.” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला

 

“ तुम्ही हे कापड पुरावा म्हणून सादर करू इच्छिता? ” पाणिनी ने दैविक ला विचारले.

 

“ हो , आमचा आग्रह आहे तसा ”

 

“ मग माझा पण आग्रह आहे की लॉण्ड्री मार्क वरून त्याची मालकीण कोण आहे याची तपासणी व्हावी आधी.” पाणिनी म्हणाला.  “ तो ड्रेस केवळ तिच्या घरी मिळाला ,हा पुरावा नाही होऊ शकत ,तो तिचाच आहे या गोष्टीचा.”

 

“ पण तो तिच्याच मापाचा आहे, तिच्याच घरी मिळालाय, दुसऱ्या कोणाचा ड्रेस कसा येईल तिच्या घरात आणि तो सुद्धा अगदी तिच्याच मापाचा ?”

 

“ सध्या आपण फक्त तो ड्रेस पुरावा म्हणून न घेता, केवळ लक्षात ठेऊ. मालकी सिध्द झाली की अनुक्रमांक टाकून पुरावा म्हणून घेऊ.” न्यायाधीश कार्तिक भाटवडेकर म्हणाले. “ दैविक तुम्ही तुमची सर तपासणी पुढे चालू ठेवा.” 

 

“ तुम्हाला प्रत्यक्ष असा काही पुरावा मिळाला का की ज्यामुळे आरोपी सांगत असलेली गोष्ट खोटी आहे हे सिध्द होईल ? ” दैविक ने विचारले.

 

“खूप पुरावे मिळाले. ” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला.

 

“ सांगा , काय काय ते ”

 

“ पहिली बाब म्हणजे तपन ने जे बूट घातले होते,ते चिखलाच्या रस्त्यावर वापरलेले नव्हते.त्या बुटांना अजिबात चिखल लागलेला नव्हता. त्याने वापरलेल्या पॅण्ट ला कोणत्याही ओलसर झुडपाचा स्पर्श ही झालेला नाही. त्याच्या कपड्यांना जरा सुद्धा चिखल नाही लागलेला.आरोपी जे सांगत्ये की मटणआणि अंडी , आम्लेट वगैरे बनवले पण खाल्ले नाही दोघानीही हे खोटे आहे कारण सर्व अन्न खावून फस्त झालेले होते. ”

 

दैविक दयाळ खुश होवून पाणिनी कडे वळून म्हणाला, “ तुम्ही घेऊ शकता उलट तपासणी.”

 

पाणिनी च्या कपाळाला आठ्या पडल्या.  “ तू म्हणालास की तपन च्या बुटाला चिखल लागलेला नव्हता. तू तपासलेस का ते बूट ? ”

 

 “ तपासले.फक्त बूट च नाही तर त्याची पॅण्ट ही तपासली.कशालाच चिखल नव्हता.तो जर कुंपणाच्या पलीकडील गवतातून फिरला असेल किंवा चिखलाच्या कच्च्या रस्त्यावरून गेला असेल तर त्याच्या कपड्याला ,बुटाला चिखल किंवा ओल्या गवताचे तुकडे चिकटलेले दिसायला हवे होते.तसे काहीही आढळले नाही.” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला.

 

पाणिनीला आश्चर्य वाटले. इन्स्पेक्टर तारकरच्या क्षमतेवर त्याचा विश्वास होताच, त्याचं बरोबर तो खोटे सांगणार नाही या बद्दल त्याला खात्री होती. दोघेही बालमित्र होते पण परिस्थितीने त्यांना एकमेकांविरुद्ध उभे केले होते.

 

“ आरोपीच्या अपार्टमेंट मधे तुम्ही शोध घेतला तेव्हा चिखल लागलेली अंडर पॅण्ट तुला मिळाली? ” पाणिनी ने विचारले.

 

“ हो मिळाली.” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला.

 

“ त्याला लागलेला चिखल हा त्या कुंपणाच्या परिसरातील चिखलाशी मिळता जुळता आहे का , म्हणजे दोन्ही ठिकाणाची माती सारखीच आहे का याची तपासणी तुम्ही केली का? ”

 

“ नाही केली.” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला.

 

“ का नाही केली मला समजेल का? ”

 

“ ती अंडर पॅण्ट म्हणजे तिथे मुद्दाम ठेवली गेलेली खोटी अंडर पॅण्ट होती असे आमचे मत आहे ,म्हणजे जसा तो ड्रेस चा तुकडा कुंपणाला मुद्दाम लटकवला होता तशीच ही अंडर पॅण्ट सुद्धा आमची दिशा भूल करण्यासाठी ठेवली होती असे आमचे मत आहे.” इन्स्पेक्टर तारकरम्हणाला

 

“ असा निष्कर्ष कोणतीही तपासणी न करता काढणे चुकीचे आहे इन्स्पेक्टर.” पाणिनी म्हणाला.  “ माझी सूचना आहे की त्या अंडर पॅण्ट ”ला लागलेल्या चिखलाचे म्हणजे मातीचे नमुने घेऊन त्याची तुलना कुंपणाच्या ठिकाणच्या मातीच्या नमुन्याशी केली जावी. मला आणखी काही विचारायचे नाही.

 

दॅट्स ऑल युअर ऑनर.”


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime