वसे हृदयी..माय मराठी
वसे हृदयी..माय मराठी
वसे मम ह्रदयी नित्य माझी माय मराठी..
देई आधार या जीवा माय माझी मराठी..
अनंत शब्दांचे सागर असे तव भव्य उदरी..
वेचीले मी काही मोती तुझ्याच या जागरी..
वंदन मम जननीस असे नंतर भारत माता..
नमन तुझ हे कर्मभूमी माय मराठी माता..
तु सुमंगल सौभाग्य तु सुहास्य वदन भागीरथी..
लाभता आशिष उजळे भाग्य सर्व फळे मनोरथी..
स्थान तुझे गोदा कृष्णा पूर्णा भीमा तटांवरी..
झालो मी तृप्त पिउनी त्या शब्दामृत घागरी..
मोगरा ज्ञानियांचा तुझेच मातीत असे फुलला..
शब्द मालेत गुंफूनी त्यास जन उद्धारा वाहिला..
थोर साहित्य संत कवींचे तुझेच कुशीत अंकुरती..
पसरे सप्तसिंधु पैलतीरी तुझी दिव्य तेज कीर्ती..
अशीच सेवा माय मराठी तुझीच नित्य करितो..
तन-मन-धनासहित जीवन तुजला हे अर्पितो..