वऱ्हाडी झटका
वऱ्हाडी झटका


तासनतास जिममधे
घाम गाळत बसायचं
काट्यावर उभं राहून
जड मनानं उतरायचं
तुम्हाला "बरं" जमतं!!
आम्हाला नाही बाई जमत!!
फुलामागे धावायचं
मर्यादेत मारायचं
शॉsssट ओरडायचं
जिंकल्यावर खुलायचं
तुम्हाला "बरं" जमतं
आम्हाला नाही बाई जमत
शब्दांमागे धावायचं
"इकडचं तिकडे" करायचं
"बरी झालीय कविता"
थंडपणे सांगायचं
तुम्हाला "बरं" जमतं!!
आम्हांला नाही बाई जमत!!
नित्यनेमे वाजवायचं
दुनियेला विसरायचं
डोलताना रमायचं
रमताना हसायचं
तुम्हाला "बरं" जमतं
आम्हाला नाही बाई जमत!!
नाजूक वाद्य घ्यायचं
खुंट्यांना पिळायचं
गज-बोटांना जपायचं
ताला-सुरात वाजवायचं
तुम्हाला "बर"जमतं
आम्हाला नाही बाई जमत
मी "बरी"आहे अशीच!!
ऐका सांगते खुशीत
मंत्र सांगते कानात
विचार करा मनात
पदार्थांत रमायचं
भरपूssर खायचं
हवं तेवढं लोळायचं
मनमुराद जगायचं
तुम्हाला "असं" जमतं??
आम्हाला बाई छाssन जमतं...