उरल्या फक्त आठवणी
उरल्या फक्त आठवणी
1 min
28.2K
पुर्वी चालत होती सुगी
पिकाची करून कापणी
रात्री खळ्यावर राहण्याच्या
उरल्या फक्त आठवणी ।।
महिना महिना सोंगणी
कणसे पसरवून खळ्यांनी
फिरवून बैलाच्या मळणी
उरल्या फक्त आठवणी ।।
जमवून रास खळ्यात
टिव्यावरून उफनणी
रास खळे पुजण्याच्या
उरल्या फक्त आठवणी ।।
शेतात रात्रीचा अंधार ऐ
किर्र किड्या काजव्यांनी
आता गेले ते दिवस
उरल्या फक्त आठवणी ।।
सहा बैलाचा नागर
बाप हाणे माळरानी
आसूडाच्या आवाजाच्या
उरल्या फक्त आठवणी ।।
मोट विहीर नाड्याची
नाही धून येत कानी
गेला आवाज कण्याचा
उरल्या फक्त आठवणी ।
