~ते~
~ते~
आपल्या अंथात नव्हते, मंथात नव्हते
तृतीयपंथात होते ते
वास्तवता की दैवयोगाने विकलांग होते ते
मायेनं अन कायेनं विकलांग होते ते
तरी देहाने गूढ होते
सुंदर कुरुपतेपासून मुक्त होते
प्रत्येकापेक्षा जरासे आगळेच होते ते
आपल्या सर्वांपेक्षा जरासे वेगळेच होते ते
आपण पोरके संजयचो त्यांना कदाचित
पण आपलेच होते ते
कुणी त्यांचा भाऊ असेल
कुणी त्यांची बहीण असेल
तरी,ते कुणाचे कुणीच नव्हते
स्त्री पुरुषाच्या मधलेच होते ते
पोटाची भूक भागतही असेल कदाचित पण
त्यांनाही एक मन असतं हे जगाने विसरले होते
कायदे त्यांस्तव नाहीच कदाचित
न्यायातुनी वंचित होते ते
पितृत्वाच्या छायेतुनही दूर होते ते
मातृत्वाच्या स्तनालाही भार होते
हे विकलांग कोण होते
तोही नव्हता,तीही नव्हती तेच होते ते
कुणासाठी खिशाला झळ होते
कुणासाठी जगातला मळ होते
डोळ्यातली पट्टी हटवा
त्यांच्याच साथीत बळ होते ते
खरे विकलांग आपुले नयन होते
तरी स्मरणात राहू द्या परके नव्हते ते
प्रेम दिल्यावर प्रेमळ होते
आपलेच होते ते, आपलेच होते ते!
