आरसा ~
आरसा ~
नको ना रडू आरशा फार झाले
तुझे वागणे रे सीमापार झाले
रिकाम्याच वाटेस मी चालतांना
अनामिक मुखवटेच एल्गार झाले
सुखाला नव्याने अता मांडतो मी
पुरे वेदनांचेच शृंगार झाले
दिलासा नकोसाच झाला मघाशी
अता सांत्वनांचेच आधार झाले
नको वेदना अन नको हास्यही मज
इथे भावनांचेच बाजार झाले
कसा मी प्रकाशात शोधू स्वतःला
जिथे काजव्यांचेच अंधार झाले
अताशीच कोठे मिळालीय भाकर
अताशीच दणगट शिरी भार झाले
पुरे वेचने ते सुगंधी फुलांचे
फुल कित्येक वेळेस अंगार झाले
किती मातृप्रेमा मिठी मारली मी
छुपे का पित्यांचेच उपकार झाले?
सदा स्फुंदते उंबरी ती घराच्या
सुके आज उंबर सुने दार झाले
पुन्हा जाळले त्या सतीला यमांनी
पुन्हा पेटले ते पुन्हा गार झाले
कुणी काढले मोर्चे बंडखोरी
नराधम क्षणिक तेच दिलदार झाले
पुन्हा मानली शत्रूता मी तयांची
जरा वाचले ते जरा ठार झाले
स्वतःलाच विणले असे मी सुरांनी
मनी राग कित्येक मल्हार झाले
न जीवन पुन्हा हे म्हणाला मला तू
विधात्या तुझे फार आभार झाले
शिकलो अखेरी रडोनी हसाया
हृदय आज बहुधा कलाकार झाले!
