~रामराज्य~
~रामराज्य~
रांगोळी असून दाराशी कटकट असते घराला
अस का बर घडतं दसऱ्याच्या सणाला
वाईट सवयी दहन करू वचन देऊन रामाला
खुशाल दारू प्यायला जातात दसऱ्याच्या सणाला
उभी आहे गृहिणी दारात ओवाळणी करायला
माझा राम रावणाला मारून येईल सोनं वाटण्याला
गृहिणी विचार करते आहे बसून तिच्या घराला
वाट पाहते नवऱ्याची तोरण बांधून दाराला
माझा पती गेला आहे दुःख दहन करायला
अहो भेटतंय तरी काय तुम्हाला फसवून तिच्या मनाला?
दोन शब्द फुटतात तुमच्या मुखातुन,मनाला दबावात ठेऊन
सोनं वाटायला जातातच कसे प्रेमाच्या धनाला कपाटात ठेऊन?
वडिलांच्या एका शब्दावर गेला होता राम चौदा वर्षे वनवास करायला
आज दहा वेळा आज्ञा करूनही मान नाही त्यांच्या शब्दाला
सणांची वाट पाहतात तुम्ही दोन गोड शब्द बोलायला
मग काय म्हणून जातात तुम्ही रावण दहन करायला?
खोट्या रावणाला मारून खरा रावण आणतात घराला
असं का बरं करतात तुंही दसऱ्याच्या सणाला?
मान सुद्धा खाली वाकत नाही तुमची मोठ्यांचा नमस्कार करायला
राम स्वतःला मानून खुशाल जातात रावण दहन करायला
रामाचे किती गुण आहेत आपल्यात एकदा विचारून बघा स्वतःला
अजून किती वेळ लावायचं ठरवलंय रामाच्या विचारांवर चालायला?
आतातरी विचार करा रामाचे चारित्र्य आचरणात आणण्यासाठी
फक्त थोड्याच प्रयत्नांची गरज आहे रामराज्य स्थापन करण्यासाठी!
