बदलत्या भावना~एक भय..!
बदलत्या भावना~एक भय..!
का रे कुणास ठाऊक होतो हृदयाला त्रास
होतो बेचैन बेचैन उगा वाढतो हा श्वास
कारण माहीत नसून उगा उदास मी होतो
कदाचित दुसऱ्याच्या दुःखा सहभागी होतो
माझ्या परवानगी शिवाय डोळे पाण्यात बुडती
भीती कशाची वाटते?का ते खाली कोसळती?
प्रकाश सोडून अचानक मन काळोखात येते
झाल्या चुकांना स्मरून फुका पस्तावा करते
करून आवाहन दुःखाचे सुख नयन मिटते
आता गरज कुणाच्यातरी मिठीची वाटते
कुठे दिवस तो गेला आला अंगणी अंधार
काही निर्णयही नाही फक्त विचार विचार
भाग्य माझेच माझ्याशी लपंडाव का खेळावे?
किती वेळा आता राज्य पुन्हा माझ्यावर यावे?
गोष्ट एकच खोल ती माझ्या हृदयी रुतते
करून काळजी मनाची मला कविता सुचते
कसे बोलता बोलता भान हरवून जातो
काळ माझीच कविता माझ्यावर उलटवतो
मग मी माझ्याच कवितेला पुढची दिशा विचारतो
काव्य माझीच वाचूनी पुन्हा तयार मी होतो
माझ्या हातात आहे आता माझ्याच काव्यांची मशाल
आता भीत नाही मी रे दुःखे येऊ दे खुशाल..!
