तानाजीचा पोवाडा
तानाजीचा पोवाडा
गद्य: १६६५ साली, पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांना कोंढाणा गड मुघलांना द्यावा लागला. मातोश्री जिजाऊंना महाराजांनी कोंढाणा सर करण्याचा शब्द दिला. तानाजी मालूसरे यांचा पुत्र रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी तानाजी, शिवाजी महारांजंकडे गेले होते, तेव्हा त्यांनी ही बातमी ऐकली आणि, 'आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे' असे सांगून लढाईला जाण्याची परवानगी मागितली आणि पुढे......
पद्य (चाल १)
वंदन करूनी गणराया, मग साधू-संता नमन करू,
मराठ-मोळ्या संस्कारांचे मनात आपुल्या जतन करु ऽऽऽऽ
जी जी जी जी||
सह्याद्रीचा केसरी लढला, स्वराज्याचा महामेरू,
मर्द मावळे जे बळी गेले, त्यांस ही आपण आज स्मरू ऽऽ
जी जी जी जी ||
(चाल २)
लेकाचे लगीन काढले,
शिवबांस आमंत्रण दिले,
तानाजीस गडाचे समजले,
तेथेच वचन वाहिले हो जी जी जी जी (२)
उपसून तलवार तो म्हणे,
हे नाही नुसते सांगणे,
आधी लगीन हो कोंढाणे,
मग लेकासाठी ते जाणे हो जी जी जी जी||(२)
घेऊन तीनशे गडी,
बांधून दोर घोरपडी,
मावळे दबकत चढी,
केली त्यांनी कुरघोडी हो जी जी जी जी ||(२)
शाहिर (गद्य): इतिहासात सांगितलं आहे, यशवंती नावाच्या घोरपडीला दोर बांधून मावळे गड चढले!
पद्य (चाल २)
उदयभानाचे हरपले भान,
धोक्यात आले की प्राण
केले वाचण्या जीवाचे रान,
दुमदुमले सारे आसमान हो जी जी जी जी||
(चाल १)
अरं, रणरागिणी संचारली, झुंझार लढाई की झाली
डाव्या हाताची ढाल केली, घाव सारे त्यावर झेली ऽऽऽ
जी जी जी जी ||
तळहातावर ठेवून जीवाला, चिंधड्या उडल्या छातीच्या,
रक्ताचा हर थेंब वाहिला, ठिक-या उडल्या पातीच्या ऽऽऽ
जी जी जी जी ||
सूर्याजी अन शेलार मामा भगवा झेंडा फडकवती,
'गड आला पण सिंह गेला', वदले तेव्हा छत्रपती ऽऽऽऽ
जी जी जी जी||