श्रीगणेशा
श्रीगणेशा
1 min
14.4K
उजाडलं तरीही
पावसाची रिपरिप
सरलीच नाही
'बा ' पायटंच फुलांच्या
हर्रासीला गेलेला.
सुमी 'च्या ' चा कप ठीउन
निमूट मायच्या मागं.
गावकुसाबाहेर सारा
चिखल झालेला
पाण्याचं डबकं,
डबक्यातून बेडकांची
डरांव डरांव सुरुच..
कुंपणालगत दुर्वा तोडायला
मायनं चिखलात पाय टाकले
भराभर इळ्यानं दूर्वा कापला..
भारा डोक्यावर अन
इचार जोरावर.
आज सारा दुर्वा
खपायलाच पायजेल
दोन महिनं झालं
नाम्याला शाळंत
बसु देइनात.
गणवेशाला पैका
जमा होइना.
आज तरी हार दुर्वा मिळून
पैका गोळा होइल
नाम्याच्या शिक्षणाचा
श्रीगणेशा होईल.
सुमी एकटक ढगांत
पहात होती
माय दुर्वांचे हार बनवत
परिस्थितीला
हरवत होती.
