साठवण...
साठवण...
1 min
43
जरी सरले दिवस
आठवणी सतावती
क्षणी एखाद्या निवांत
पुन्हा पुन्हा आठवती
घरे होती ती कौलारू
ऐसपैस अंंगणे ती
कशी दाट दाट झाडी
उभी भोवताली होती
शाळा होती जरी छोटी
भले मोठे पटांगण
होई करड्या शिस्तीत
विद्यार्थ्यांचे विद्यार्जन
नसे पाठीवर सॅक
नाही बॉटल पाण्याची
एका पितळी डब्यात
पोळीभाजी असायची
खाऊ चिमणी दाताने
खात होतो तो तोडून
होता इवलासा खाऊ
मैत्री घट्ट ती अजून
नसायची स्कूलबस
आम्ही जायचो धावत
रस्ता कटायचा सारा
छान कविता म्हणत
जरी झालो आम्ही मोठे
याद येती ते दिवस
गावी होतो सारे गोळा
भेटीगाठीसाठी खास
होते उजळणी पुन्हा
आठवती गोड क्षण
जुन्या जरी आठवणी
नव्यानेच साठवण
