रे पावसा ...!
रे पावसा ...!
1 min
277
रे पावसा असो मनाची
वा मातीची पाषाणाची
कोरड्याठाक धरतीस या
आस तुझिया आगमनाची
टिपटिप तुझ्या संगितासवे
बेभान मजला आज नाचू दे
घन आले रे भावनांचे दाटून
आज हृदयी तळे साचू दे
थेंब थेंब मोतियांची माळा
लेऊन मजला सजू दे
जन्मभर थकल्या डोळ्यांस आज
एक घडी सुखाने निजू दे
पापण्यांच्या पुडीत लपलेली
आसवे सारी निचरू दे
थेंबांच्या पायऱ्यांवरूनी
इंद्रधनू भुईवर उतरू दे
सप्तरंगी सावलीत त्याच्या
सात जन्म माझे रंगू दे
आस आसवांची तुझ्यात विरण्याची
दुखवून मजला न भंगू दे
