पुरणपोळी (फसलेली)
पुरणपोळी (फसलेली)
घरी असे नेहमी धूम सणाची
आई करे पुरणपोळी आवडीची
एकदा सणाला आई पडली आजारी
मग माझ्यावर आली जबाबदारी।।
आईला म्हटले कसली गं भीती
तू घेऊ नको गं टेन्शन पोळ्यांचे,
झरझर घालते चणाडाळ शिजायला,
सोपे वाटले मला जेवण पोळ्यांचे।।
करायला घेतले नी धाबे दणाणले,
माझ्यापुढे डाळ शिजता शिजेना,
भाताने तर चिखलगाव दाखवले
कणिक तर परातीत पसरणे सोडेना,
पुरण तर पाट्यावर बारीकच होईना,
कसेबसे कणिक-पुरणाचे जुळवले सूर
तर पोळपाटावर त्यांचे मेतकूट सुटेना,
अर्धी पोळी बसली रुसून पोळपाटावर,
कटाच्या आमटीची झाली न्यारी बात,
पाण्याची टाकी झाली पालथी त्यात,
मिठाचा आमटीला लागेना वास,
जळक्या पोळीचा आईला आला वास,
माझा अवतार पाहून आईला आले हसू,
आणि डोळ्यात आले आनंदाचे आसू,
लेकीच्या पुरणपोळीचा खाल्ला घास,
तिच्यासाठी तो अमृततुल्य गोडीचा खास,
अशी झाली होती तेव्हा माझी फजिती,
मऊसूत पोळीला आज मिळतो बेहद मान
पण, ती अमृततुल्य चव नाही कशाला,
आणि कौतुक करणारी नसे ती आई पण।।
