पंख फुटावे लेखणीला...!
पंख फुटावे लेखणीला...!
मनात माझ्या असे एक इच्छा, वाटते मला ती पूर्ण व्हावी..!
कागद व्हावा आकाशाचा, अन् समुद्राची शाई व्हावी..!
पंख फुटावे लेखणीला माझ्या, गरुड भरारी तिने घ्यावी..!
शाई वाहून तिने सागराची, कोऱ्या नभाची पाने रेखाटावी..!
आणिक असे मला वाटते, माझी लेखणी मनकवडी व्हावी..!
जे जे असेल मनात माझ्या, तिने ती अक्षरे लिहून काढावी..!
सुंदर विचार आणि शब्दांनी, तिने आकाशी ढगे भरावी..!
नाविन्याचा लागून तो वारा, शब्दरुपी ढगे ती बरसावी..!
येऊन पूर सु-साहित्याचा, सकारात्मक विचार धरणे भरावी..!
घाण सारी नकारात्मक विचारांची, पुरात त्या वाहून जावी..!
साहित्य वर्षा जल ते पिऊन, वाचक मने ती हर्षावी..!
अशीच या लेखणीने माझ्या, वाचंकाची तहान भागवावी..!
रंग भरुनी इंद्रधनुचे, जिवनी त्यांच्या, ती ज्ञानरंगी रंगावी..!
सहित्यामृत ते करुनी प्राशन, साहित्यप्रेमी तृप्त व्हावी..!
सहवासात त्या सु-साहित्याच्या, रसिक मनेही प्रफुल्लित व्हावी..!
सुटून दरवळ माय मराठीचा, साहित्य मृदा ती सुगंधी व्हावी..!
- गंगाशिवकापुत्र
