ओढ मिलनाची
ओढ मिलनाची

1 min

55
दिशा ही मावळतीची
मंद मंद शांत वारा
वाळूतच स्तब्ध झाला
दूर सागरी किनारा ..||१||
सांजवेळी क्षितिजास
निळाईचे प्रतिबिंब
सागराच्या कुशीतले
सुवर्णिय ओजबिंब..||२||
हेलकावे घेई नाव
अशा अथांग सागरी
अवखळ धुंद वात
स्वार होई लाटेवरी..||३||
आकाशाचा रंग सारा
माडावरी स्थिरावला
शांत सागरी किनारा
एकांतात सुखावला..||४||
पक्षी होवून स्वच्छंदी
घ्यावी भरारी आकाशी
ठसे शोधावे किनारी
इच्छा एकच मनाशी..||५||
ओढ तिला मिलनाची
उसळून येई लाट
देण्या तिस आलिंगन
किनाराच पाही वाट..||६||
पांघरावे आसमान
हेच कर्म समुद्राचे
सोबतीस ना कुणीही
हेच मर्म अस्तित्वाचे..||७||