नवरात्रीच्या रंगांचे महत्त्व
नवरात्रीच्या रंगांचे महत्त्व
आली नवरात्र नऊ दिवसाची
घेऊन नवा उत्साह घराघरात,
पिवळा रंग प्रतीक उबदारपणाचा
आशादायी, आनंद देई मनामनात.
दिवस दुसरा नवरात्रीचा
हिरवा रंग प्रतीक निसर्गाचे,
करे जीवनाची नवीन सुरुवात
महत्व जाणुनी या रंगाचे.
नवरात्रीचा दिवस तिसरा
रंग राखाडी घेऊन आला,
प्रतीक संतुलित विचारसरणीचा
उठून दिसे साध्या राहणीमानाला.
सकारात्मक उर्जेचा रंग नारंगी
नवरात्रीचा चौथा दिवस,
निर्माण करे उत्साह मनात
त्याग, धैर्य, बुद्धी, पराक्रमांचा रस!!!
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी
रंग पांढरा साधेपणाचा,
देतो भावना सुरक्षिततेची*
मनी वास आत्मशांतीचा.
लाल रंग देई उत्साह
जागवे चैतन्य वाढवे शक्ती,
सहाव्या दिवशी नवरात्रीच्या
चुनरी अर्पून करूया भक्ती.
समृद्धी शांती देई जीवनात
गडद निळा रंग आनंदाचा,
दिवस नवरात्रीचा सातवा
प्रतीक उत्तम आरोग्याचा.
रंग प्रेमाचा आकर्षक गुलाबी
आपुलकी आणि सुसंवादात्मक,
नवरात्रीच्या आठव्या दिवशी
प्रफुल्लित करे आशा प्रतीकात्मक.
सुरेख, भव्य असा जांभळा रंग
देई भक्तांना समृद्धी, सफलता,
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर
दिवस नवमीचा मंगलमयता.
