नादमयी उषःकाल
नादमयी उषःकाल
1 min
369
पाखरांची मधुर किलबिल
प्रभाती सूर रंगती
निळ्या आभाळी सलज्ज उषा
गुलाल उधळे पुनवती (1)
प्रातःकाळी नाद मधुर
वासुदेवाच्या चिपळ्यांचा
मोरपिसांच्या टोपीसंगे
झुलतो नाद कन्हैय्याचा (2)
जात्यावरची घरघर
ओवीसंगे मधुरचि
मायमुखातुनी अमृत
आस पुरवी कानांची (3)
भूपाळीचे स्वर येती
देवघरातून आजीचे
झोपेतुनि जाग येता
मन मोहरते माझे (4)
खळखळ पाणी धावे
अवखळ मोटेतुनी
वाफे ओसंडुन जाती
चहूबाजू रानातुनी (5)
निसर्ग नादे रमते
आजोळी मी नादखुळी
शहरातिल गोंगाट
किटवे किनांची पाळी (6)
