न पाहिलेला पाऊस...
न पाहिलेला पाऊस...


तापलेली माती अन् भेगा पडलेल्या जमिनी
दुष्काळाने वेढेलेले असे एका गावाला
चातक होऊन वाट पाहे सारे
पावसाच्या एक एक थेंबाला...
असाच होता एक अवखळ अल्लड
ज्याच्या मनात थैमान विचारांचे
आईला आपल्या हट्ट करत बोले
आताच सांग वर्णन पावसाचे...
आठवणींच्या पानांत मन
जसे पावसाला आठवू लागले
क्षणभर भांबावलेल्या आईचे
सुकलेले ओठ विलग झाले...
सोसाट्याच्या गार वाऱ्यासंगे
क्षणात जेव्हा धुके पसरतील
तेव्हाच जा समजून बाळा
आज मेघराज बरसतील...
तप्त असलेल्या जमिनीवर
जरी
असेल आता शुकशुकाट
त्याची चाहूल लागताच होईल
पक्षांचा नुसता किलबिलाट...
बागडतील रानांतील फुलपाखरे
मन होईल अगदी स्वच्छंद,
धरणीवरी पडताच श्रावणधारा
दरवळेल बघ ओल्या मातीचा गंध...
हिरवा गार होईल पाला पाचोळा,
येईल बहार कोरड्या नदीला,
पावसाचे सुंदर वर्णन करत
आई म्हणाली आपल्या शामला...
पावसाचे हे वर्णन ऐकताच
मलूल चेहरा त्याचा प्रसन्न झाला,
आईच्या शब्दांत अनुभवला शाम ने
आजवर न पाहिलेल्या पावसाला...
- अक्षता कुरडे.