मोरपीस
मोरपीस


अनोळखी ही हुरहुर कसली,
ओळखीच्या त्याच्यासाठी!
जपलेल्या त्या नाजुक भावना,
अलगद दडविलेले मोरपीस ते...
मनातल्या हळुवार कोंदणात !
पडदा पडला संसाराचा...
झाकाेळली ती ठेव माझी
जीवनाच्या-संसार गाड्यात
विसरले मी ठेव माझी!
आयुष्याच्या मध्यात उघडला
आता तो पडदा अवचित!
पण हे सारे... नवीन भासते...
धूसर आठवणी... काही गूढ...
कशी पटावी ओळख आता?
काहीतरी होते तेव्हा,
काही तरी होते तिथे!
अनाकलनीय भावना ती
जरा आठवे, जरा विसरे
आता पुन्हा हे नवखे वाटे!
मन आनंदी, चेहरा चमके
मलाच मी ना कशी उमगले?
हृदयी कवटाळू की जतन करू
कसे दडवू हे मोरपीस आता.?
योग्य-अयोग्याच्या सामाजिक चक्रात,
पुन्हा हरवू नये हे मोरपीस माझे??
भीती उगाच ही, मनी दाटे!