माझी लेखणी
माझी लेखणी


*अष्टाक्षरी रचना*
माझी लेखणी महान
अंतरात ओजबिंब
मनातले ओळखून
दावी मज प्रतिबिंब ||१||
छंद लागे लेखणीचा
विसरले देहभान
जन करती सकल
अमृताचे रसपान ||२||
लेखणीचा इतिहास
आहे मोठा घरंदाज
जगावर राज्य करी
तिचा तसाच अंदाज ||३||
भाळे सौंदर्यावरती
करी लेखणी शृंगार
हाच मदन ठसका
इश्क भरवी बाजार ||४||
डफ संगे तुणतुणे
करी शाहिर प्रहार
तिचे नेतृत्व झुंजार
लेखणीचे धारदार ||५||
सिंहापरी गरजे ती
वीरतेशी दृढ नाते
उठे हि सळसळून
लकाकते तिचे पाते ||६||
राजा शंभूची लेखणी
ग्रंथ हा बुद्धभूषण
जाण आहे इतिहासा
असा साहित्यभूषण ||७||
झुंज तिची वादळाशी
वेळ ती शिवशाहीची
लेखणीची हि ताकद
रग मराठी रक्ताची ||८||
हिच माझी सोबतीण
बलशाली व देखणी
मुक्या भावना शोधीशी
माझी संगिनी लेखणी ||९||