कविता
कविता
भावनेचं आकाश गडद होताना
वेदनेचे हुंकार शब्द मागतात..
मनाच्या टीप कागदावर अलगद
दुःखाच्या ओळी पाझरू
लागतात...
सोपं नसतं कविता करणं
शब्दांची जुळवाजुळव करण...
दुसऱ्यांच्या भावनांना शब्दात प्रसवून..
जणू परक्याची आई होण....
कवितेच्या सगळ्या अवघड प्रवासात
अनेक शब्द वाट हरवतात..
गरज नाही असे शब्द
महत्वाचे म्हणून पुढे मिरवतात..
लावावी लागते भावनांना चाळण
मोजावे लागतात अश्रुंचे शब्द
भटकावे लागते वेदनेच्या रानात
तेव्हा कुठे अर्थ उभा राहतो स्तब्द...
कविता म्हणजे मशाल
वेदनेने अंधारलेल्या गगनात..
कविता म्हणजे प्राजक्त सडा
भावनेने सारवलेल्या अंगणात
कविता म्हणजे असतो संवाद
मनाचा मनाशी निरंतर चाललेला.....
कविता म्हणजे असतो वार
अलगद काळजावर झेललेला.
