कवी आणि कविता
कवी आणि कविता


कवी नसतो कुणी अवतारी पुरुष
तो असतो एक संसारी माणूस
कवी इतरांसारखाच उभा राहतो रांगेत
कधी ती रांग असते बँकेच्या एटीएमसमोरची
तर कधी रेल्वेच्या तिकीटखिडकीसमोरची
कधी रांग असते सिनेमाच्या तिकिटासाठीची
तर कधी देवळातील देवाच्या दर्शनासाठीची
या रांगेतील प्रत्येकजण दिसतो त्रस्त
मात्र कवी असतो स्वत:तच मस्त
रांगेतील प्रत्येकाचा चेहरा तो न्याहाळतो
समोरील व्यक्तीच्या अंतरंगात डोकावतो
अंतरंगापासून अन्तराळापर्यंत फिरते त्याची दृष्टी
क्षणार्धात तो कवेत घेतो सारी सृष्टी
कवीजवळ असते एक अदृश्य क्ष-किरण यंत्र
त्या यंत्राने तो समोरच्याचा एक्स रे काढतो
तो एक्स रे डेव्हलप करून
कवी त्याची 'एक्स रे फिल्म' बनवतो
ती फिल्म म्हणजेच असते त्या कवीची कविता
त्या कवितेत असतो मानवाच्या
भावभावनांचा कल्लोळ
मानवी सुख, दु:ख, वेदना, दाह, आनंद
आणि आणखी बरेच काही
तीमध्ये असते सामावलेले सारे विश्व
कवीला हे सारे जमते
कारण त्याच्या अंतरात जन्म घेते
एक अलौकिक शक्ती.
म्हणूनच तो कवी असतो,
जरी असला तो तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस