कोजागिरी
कोजागिरी
अप्रतिम ते रूप मनोहर
जीवा लाविते ओढ किती
पुर्ण रूप ते धारण करूनी
सजली आज कोजागरति
मंद मधुर तो वारा वाहे
हास्याने फुलली धरती
चांदणं चुरा शुभ्र पसरला
नभांगणी तेथे वरती
बालमंडळी नर-नारीही
सौख्याने सारे जमती
भेद सारूनी सर्व मनीचे
मधूर गोड गायन गाती
सत्व असे त्या शशि-किरणांचे
शुध्द हवा अवति-भवती
गोरस अमृत होऊन जाई
सान-थोर प्राशन करती
चांदण शिंपण आठवणींची
सागरास येई भरती
बेधुंद होऊनी लाटांची मग
उधाणून येते प्रीती
क्षणोक्षणी वाटे मजलाही
नित्य असावे तू सोबती
पूनवेचा हा चंद्र बघाया
हात तुझा घेऊन हाती
