कान्हा ( गौळण )
कान्हा ( गौळण )
यशोदा माझा फुटला गं घडा
तुझ्या कान्हाने मारला गं खडा !! धृ !!
एकटी पाहून करी धिटाई
उरात होते धडधड बाई
हात पकडता फुटतो चुडा
तुझ्या कान्हाने मारला गं खडा !! १ !!
दही , दुध मथुरेच्या बाजारी
विकण्या जातो गोकुळच्या नारी
लोण्यासाठी पेंद्या बोले बोबडा
तुझ्या कान्हाने मारला गं खडा !! २ !!
घरा येई रात्रीस चक्रपाणी
तोडी शिंकाळे खाई दुध लोणी
अगं मैया सवाल आहे कडा
तुझ्या कान्हाने मारला गं खडा !! ३ !!
सांगून थकले या यशोदेला
करीन कागाळी नंदबाबाला
शिकवीन त्याला चांगला धडा
तुझ्या कान्हाने मारला गं खडा !! ४ !!
गालात हसुनी मिठी मारतो
खुशाल येवोनी गोड बोलतो
कला दावितो कामी घाली खोडा
तुझ्या कान्हाने मारला गं खडा !! ५ !!