झिम्माड श्रावणसरी
झिम्माड श्रावणसरी
झडझड आषाढाची
आता सरली गं सये
रिमझिम सरी ओल्या
धरेवरी झरती गे
रश्मी किरणांमधूनी
ऊन हळदुले झरे
अंबरात सप्तरंगी
गोफ धनूचा गं सजे
रिमझिम सरी येती
क्षणभरे थबकती
अभ्रांतूनी रविराज
हळूहळू डोकावती
ऊन पावसाचा खेळ
वसुंधरा सुखावली
वस्त्रे हिरवी लेऊनी
स्वागतास सज्ज झाली
फांदी कोवळी लाजुनी
हळू बिलगे वृक्षाला
साज ओला हिरवाई
हळू दाखवी वल्लीला
आला श्रावण हर्षाने
सरीवर सरी येती
धरेवरी हिरवाई
गोड फुले उमलती
सरी श्रावणाच्या देती
मोद प्रेमिक जनांना
भेटी तयांच्या फुलती
ओलेचिंब भिजताना
रिमझिम पावसाची
सुखविते सकलांसी
आला आला हा श्रावण
मन आले बहरासी