गणपती बाप्पा !!
गणपती बाप्पा !!
उंदरावर बैसोनी कसे दुडदुडा आले
गणपती बाप्पा आमचे भू वर अवतरले
टाळं मृदुंग शंखांचे झंकारले स्वर
प्रसन्न झाली धरणी मोहरले चराचर
जयदेव जयदेव जय गणपती बाप्पा
राहू दे निरंतर तुमची आमच्यावर कृपा ।। धृ ।।
बाप्पा पुढे झगमगली दिव्यांची माळ
कर्पुर धुपाचा पसरला सुगंधी दरवळ
रक्त वर्ण फुलांनी सजली कमान
आसनावर हिरवी केवढ्याची पानं
जयदेव जयदेव जय गणपती बाप्पा
राहू दे निरंतर तूमची आमच्यावर कृपा ।। १।।
भाळी चंदन टिळा कुंकु, आरक्त लाल
एकदंत लंबोदर, बाप्पांचे गोबरे गाल
हाती मोदक लाडू अन् जास्वंदी फुल
बाप्पाच्या कानी शोभती मोत्यांचे डूल
जयदेव जयदेव जय गणपती बाप्पा
राहू दे निरंतर तू
मची आमच्यावर कृपा ।। २।।
पितांबर भरजरी गणपती बाप्पा नेसला
खांद्यावर शोभे नक्षीदार रेशमी शेला
अंगावर झुलती हिरव्या दुर्वांकुर माला
पायांत उजव्या सोन्याचा वाळा
जयदेव जयदेव जय गणपती बाप्पा
राहू दे निरंतर तुमची आमच्यावर कृपा ।। ३।।
गणराजांचे रूप लोभस किती छान
नतमस्तक होवूनी प्रशांत करतो प्रणाम
मिळून सारे भक्त करूया बाप्पांचे पुजन
स्वागत करू बाप्पांचे गुलाल उधळून
जयदेव जयदेव जय गणपती बाप्पा
राहू दे निरंतर तुमची आमच्यावर कृपा ।। ४।।
आरती करता बाप्पा प्रसन्न होतील
सर्वांची दु:खे, सर्वांची विघ्ने, दूर करतील
जयदेव जयदेव जय गणपती बाप्पा
राहू दे निरंतर तुमची आमच्यावर कृपा ।। ५।।