द्रौपदी
द्रौपदी
द्रुपद राजाची लाडाची कन्या
भाग्यवान बाळी लाभे ऐश्वर्या
वर कोणता शोधावा नुमजे
द्रुपद राजाला हो
हवा पराक्रमी अन् राजकुळी
रुपवान तेज गुण झळाळी
स्वयंवर भरवूनी लाभावा
वर द्रौपदीसी हो
मत्स्यभेद करी वीर अर्जुन
वरमाला घाली त्याला लाजून
पाच पांडवांची राणी झाली
द्रुपदकन्या हो
दिसामागून दिस चालत गेले
दुर्दैवाचे दिन सामोरी आले
शकुनीमामाने डाव कपटाचा
द्यूतात साधला हो
काळवेळ ती गाठून आली
राज्य वैभवास गिळून गेली
एक द्रौपदी राहिली तिलाही
लावली पणाला हो
हरले धर्मराज ह्या खेळामधे
कुटीलांचे मग चेहरे उजळले
आणली फरफटत दुर्योधनाने
द्रौपदी दरबारी हो
काय सांगा होता माझा हो गुन्हा
निर्ल्लजपणे केले वस्त्रहरणा
भाऊ श्रीकृष्ण धावूनी आला
लज्जारक्षणासी हो
आदर मांगल्याची द्रौपदी मूर्ती
माया प्रेम वात्सल्याची परिपूर्ती
वस्तू नाही स्त्री निर्जीव कशी
पणास लावली हो
अन्यायच झाला द्रौपदीवरी
दुर्योधन छळी भर सभेमधी
लांब घनदाट कुंतलासही
हात घातला हो
पाच पांडव असूनी सभेत
उठला नाही त्यातला एक
खाली माना घालून बसले
पाचही पांडव हो
कुंतल बांधूनी द्रौपदी पेटे
नाही लावणार तेल कचपाशे
दुष्टांचे रक्त लावीन तयाते
घोर प्रतिज्ञाच ती
प्रतिज्ञापूर्ती केली वीरपत्नीने
संयमाची जोड संकटामधे
म्हणूनच नाव घेतले जाते
पंचकन्यांमधी हो
