देव माणुसकी
देव माणुसकी


आज निःस्वार्थ स्वभावी
नाही कोणीच भेटत
तुडवतो पायदळी
स्वतःसाठी नकळत...
जगण्यास माणसाच्या
साथ अमाणुसकीची
भेदभाव वृत्ती असे
मनोमनी प्रत्येकाची...
जणू ठेवली गहाण
माणुसकी स्वार्थापायी
कोंडलेल्या विश्वासात
देव नाही देवालयी...
शोधण्यास एक भाव
सुट्टीवर धाव घेई
देवाचाही भावनांनी
उर उन्मळून येई...
घरोघरी कलियुगी
रूप घेऊन तो गेला
दुःखी सृष्टिदाता मात्र
दारातच थबकला...
झाला पाहून व्याकुळ
भयानक घरपण
साठवून अंतर्मनी
अत्याचारी दडपण...
समजूत घालण्यास
देवपण विसरला
हातापाया पडण्यात
पुण्यवान हरवला...
असा दुर्दैवी दिवस
देवावर फोफावला
स्वतः निर्माता असून
क्षणोक्षणी दुखावला...
वैचारिक देव रूप
माणसाने ओळखावा
एकमेकां समानता
धर्म हा खरा जाणावा...