चिऊताई
चिऊताई
भुरक्या रंगाची नाजूक जीवाची,
दाणे खायला यायची पूर्वी एक चिऊताई.
चिव चिव करणाऱ्या आवाजाला विसरलो नाही,
आज पुन्हा बघितली फक्त एकच चिऊताई.
थव्यात राहणारा जीव आज एकटाच पडला,
माणसाच्या संशोधनाने त्यांचा इतिहास घडला.
किलबिल करणारे पक्षी कुठेच बघायला मिळत नाही,
आज पुन्हा बघितली फक्त एकच चिऊताई.
तांदळाचे दाणे फेकले जमिनीवर तिच्यासाठी,
दाणे येणार का चीवताई पण कुणासाठी.
दाणे फेकणारे लहान हात मोबाईलच व्यस्त झाले,
चिऊताई अशी रुसली की तिचे अस्तित्व नष्ट होण्यावर आले.
नवीन पिढी चिऊताई वर निबंध लिहीते,
विचारते तिचे वजन किती होते.
चोचीने दाणे खाणारी चिऊताई,
खरंच मेणाच्या घरात राहते.
घड्याळीच्या अलार्म ने नाही तर बंद डोळे तिच्या किलबिलाटने उडायचे.
भर उन्हात रानामध्ये पाणी तिच्यासाठीच झाडावर लटकवायचे.
त्या चिऊताईची महत्त्व पुन्हा सांगावसे वाटते,
तिच्यासोबत जगलेली बालपण पुन्हा जगावेसे वाटते.
