"बुवा बाजी"
"बुवा बाजी"
।।|बुवा बाजीच्या नादा लागायचं नाय।।
बुवा बाजीच्या नादा लागून, लई वैताग करून घ्यायचा नाय।
अन देव-धर्म अन नवस करीत, जलमभर रडत बसायच नाय।।धृ।।
गरीब बिचारी गाय म्हणून, आया-बाया बोलू लागल्या।
नवरा असून पोरं नाही म्हणून, वांझोटी म्हणू लागल्या।।
अंगारा धुपारा करून थकले सारे, तब्बेत चालली वाया।
सासरकडची बोलणी ऐकून, डोकं नवऱ्याचं फिरलया।।
पोरांसाठी दुसरी केली तरी, पाळणा काय हलायचा नाय।
नवसाने पोर होतात असं खोट सांगत, हिंडायचं नाय ।।१।।
कोणी म्हणे धनासाठी बळी घ्यावे लेकराला।
अन तवा म्हणे देव पावेल, तुमच्या नवसाला।।
सोन्याच्या-चांदीची गाय करून अर्पण करा देवाला।
मनातली इच्छा पुरी करीन, घबाड मिळालं भक्ताला।।
असं कोंबड्या बकर मारुन, देव कधीच पावायचा नाय।
अन एवढं सगळं करूनही, अजून देव कुणा दिसला नाय।।२।।
तोंडाचे चोचले पुरवण्यासाठी, मुका जीव मारतात
देवाच्या नावाखाली लोक, दुसऱ्याच पोर मारतात।।
या देशात गरिबाच्या पोटाला दोन घास,अन्न मिळत नाही।
दगडाच्या देवाला दानासाठी, दानपेटीत जागा पुरत नाही।।
माणसांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक कळत नाय।
अन स्वतःच पोरगं बळी गेल्याशिवाय, खरं खोटं कळत नाय।।३।।
