STORYMIRROR

Mrudula Raje

Others

4  

Mrudula Raje

Others

बुद्धीबळाचे राज्य

बुद्धीबळाचे राज्य

1 min
272

शक्तीचाच खेळ हा सारा, शक्तीचाच आघात।

बुद्धीबळातील राजा करतो प्याद्यांवरती मात॥


कष्टकरी अन् बुद्धीजीवी जन , जरी किती राबले।

लोकप्रियता, मान - मरातब, जरी त्यांस लाभले।

समाजकार्यासाठी त्यांना जरी मिळे मदतीचा हात।

बुद्धीबळातील राजा करतो प्याद्यांवरती मात॥


कलावंत गुणी, साहित्यिक बहु, अति प्रतिभाशाली।

शिक्षणक्षेत्रामध्ये तयांची वाह -वाह जाहली।

परी राजाची मोहर उमटावी, हाच एक प्रघात।

बुद्धीबळातील राजा करतो प्याद्यांवरती मात॥


कुठले घोडे, कुठले ऊंट,वजिराला कोण विचारी।

' राजा बोले, दळ हाले ' , हेच सूत्र सरकर- दरबारी।

राजाचा निर्णय अंतिम, कधी करी राज्याचाही घात।

बुद्धीबळातील राजा करतो प्याद्यांवरती मात॥


हेच काय ते सत्य अंतिम, जगताच्या विजयाचे?।

वाहतील का वारे कधी या जगती उत्क्रांतीचे? ।

पायाखाली चिरडली जी प्यादी, कधी आणतील का झंझावात?।

हर्षभरीत जग आनंदे म्हणेल, " केली प्याद्यांनी राजावर मात!!"॥


Rate this content
Log in