बहीण
बहीण
1 min
387
माझी बहीण प्रेमाची
खूप असे गं लाडाची
खेळविले बालपणी
जाण धाकटेपणाची (१)
छोटेपणी गुजगोष्टी
शाळेतल्या सांगे मज
अभ्यासात रमे खूप
पूर आठवांचा आज (२)
लग्नामधे करवली
हौसेमौजे मिरवली
सोडताना सासरला
धाय धाय गं रडली (३)
प्रेम करी जीवेभावे
तिला चैन नाही जीवा
कधी विसरले तरी
झोपेपूर्वी फोन हवा (४)
नाते जमे डहाळीचे
माहेरच्या वृक्षावरी
किती झुललो डुललो
आता गेलो दूरवरी (५)
दाट माया गुंतवीत
नाते एकरुपतेत
राहो प्रपाताप्रमाणे
अखंडीत बरसत (६)
