अंधाराचा अर्थ
अंधाराचा अर्थ


अंधाराचा अर्थ आज
पुन्हा नव्याने गवसला,
ताऱ्यांना निरखताना
गर्द काळोखात लपला.
कीव आली आज जरा
चमकणाऱ्या चांदण्यांची,
बांधील त्या काळोखाला
आयुष्य जोडून घेण्याची.
वाटले सांगावे त्यांस
महत्व स्वातंत्र्याचे जरा,
तोडावे का बंध त्यांचे
का हरवावे त्यांत जरा.
लुकलुकणाऱ्या त्यांस
बंदिस्त करावे नयनी,
का नजरकैदित ठेवावे
काजव्यासम ह्या बरणी.
प्रीत त्यांची चंद्रासवे
तोडावी का निर्दयपणे?
अमावस्येच्या चंद्राची
याद द्यावी का क्रूरपणे?
का मागे मज चंद्र हा
भीक बांधील ठेवण्याची?
का झाली असेल त्याला
भीती एकटा पडण्याची?
असेल जर हे खरं
तर कळेल त्याला मी,
मित्र असले तरीही
का पडते एकटीच मी.
ताऱ्यांचेही असेल हे
सोबती असूनही दूर,
का वाटते आता मज
आपलेच चालले दूर?
मग साकडे घातले
त्या स्वार्थी चंद्राला शेवटी,
तू साथ दे आता मला
न व्हावी आता मी एकटी!
मान्य केले त्याने आज
राहीन नेहमी सोबती,
अमावास्येला असेल
तरी तारे तुझ्या सोबती.
अंधाराचा अर्थ आज
पुन्हा नव्याने गवसला,
एकटेपणा हा आता
ताऱ्यांत थोडा विसावला.