आमुची मराठी...!
आमुची मराठी...!
माझी मातृभाषा । माऊली मराठी।
आहे सर्वांसाठी । सर्व काळ।।
राज भाषा हीच । कर्म भाषा हीच।
धर्म भाषा हीच।सर्वांसाठी।।
कोमल शामल। नम्र ही विनम्र।
सर्वांचे ही मर्म।जाणतसे।।
साधी सोपी गोड। हिला नाही तोड।
नाही मारझोड।हिच्या पोटी।।
ज्ञान भरपूर।हिच्या उदरात।
तेच पदरात । घालतसे ।।
भले भले आले। शिकले वाचले।
जीवन जगले।सुखा सवे।।
फोड साधी सोपी।सर्वांना भावली।
मराठी माऊली। ज्ञानेशाची।।
हिचा अभिमान।मनात वसतो।
अंतरी दिसतो।सदोदित।।
धन्य मी अजाण।लेक मराठीचा।
पाईक भाषेचा।झाला असे ।।
अभिमान मला।माझ्या मराठीचा।
आहे कायमचा। हृदयात।।
मराठी आमुची। असे मायबोली ।
मायेची सावली। सदोदित ।।
वाढू दे फुलू दे। माझी मातृभाषा।
हीच अभिलाषा।अंतरात।।
