आली दिवाळी
आली दिवाळी
आली दिवाळी उधळीत आनंद।
उटण्याचा दरवळला सुगंध॥
महिलांची फराळाची लगबग।
उत्साहात विसरती दगदग॥
लेकी उत्सुक काढण्यास रांगोळी ।
आरास सुंदर सजवी दिवाळी॥
मुलांना लागले वेध फटाक्यांचे।
फुलबाजी, चक्री, बाॅम्ब फोडण्याचे॥
चिंता पुरुषांना मिळेल का सुट्टी।
मौजमजेशी कशी करावी गट्टी॥
कुटुंब सारे रंगले उत्साहात।
न्यून नको दिवाळीच्या स्वागतात॥
परी दिवाळीची एकच मागणी।
गरिबां घरी करा दिवे लागणी॥
वृद्धाश्रमामध्ये द्यावा हा फराळ।
सुखवावे त्यांना कधी अल्पकाळ॥
अनाथ बालकां वस्त्र दान द्यावे ।
गोड घास देत, कौतुक करावे॥
करावी दिवाळी सैनिकांच्या संगे।
दिवाळीचा सण मला हेच सांगे॥
सुखमय माझी होईल दिवाळी।
सुखवीेन जेव्हा प्रभू वनमाळी॥
गरिबांचा त्राता, दीनांचा कैवारी।
करेल माझीही दिवाळी साजरी॥
