आई
आई
आई संस्कारी नात्यांचा सुंदर गोफ
अविरत उमलणारं स्नेहाचं रोप.
आई संवेदनशील हृदयाचा सुखद लळा;
ऊर्जा देहाची व मनाचा जिव्हाळा.
आई अंगणातील रांगोळी साजरी;
सोडून जाई कुठेना लेकुरवाळी बावरी.
आई ममता-वात्सल्याचा अभंग गाभारा;
ऊन्हातील छाया अन गारव्यातील उबारा.
आई सुख-दुःखाचा रम्य सोहळा;
संकटातही फुलणारा गुलमोहर कोवळा.
आई शब्दफुलांचा मोहक सुगंध;
त्याग-समर्पणाचा अतूट असा बंध.
आई भगवंत नामातील गोड वाणी
रखरखीत वाळवंटातील थंडगार पाणी.
आई आरतीत वाजणारी मधुर टाळी;
वेदनेनंतर निघणारी प्रथम करूण आरोळी.
आई सुख-शांती-समृध्दीच लेणं;
संस्कृतीच विद्यापीठ रूपाने विधात्याचं देणं.
आई आपला मोक्षधाम मथुरा-काशी;
स्वर्ग मानावा आईच्या पायापाशी.
