आई
आई
आई चा असा खास दिवस असतो का साजरा करायला?
तिला तर रोजच, आपलं बाळ दिसावे वाटते नजरेला..
आताची आई अशी धावपळीत असते,
बाळाला सांभाळत सांभाळत ऑफिस गाठते..
सोडून जाताना बाळाला, तिला होत नसतील का वेदना?
पण घेतलेल्या शिक्षणाला
न्याय तर द्यायला हवा,
असे मनाशीच बोलत ,
ती गोंजारत राहते
कितीतरी वेळ आल्यावर बाळाला.
खूपदा तीळ तीळ तुटत राहते
तिचे हृदय, रडणार लेकरू पाहून.
पण मन घट्ट करत ती
निघते जड पाऊल उचलून..
हळूहळू बाळ मोठं होत राहत,
त्याच्याकडे पाहताना तिचं मन आता सुखावून जातं..
आपला कठोर निर्णय बाळासाठी होता
याचं तिला आता समाधान मिळतं..
मोठी झालेली लेकरं आता
तिची वाट पहात उभी असतात
आईच्या कष्टाची जरा भरपाई करतात,
सुखाने राहावे म्हणून ती
धडपड करत राहतात.
बाबा असतोच आधार
माहीत असतं सर्वांना..
आईच काहीतरी खास असतं मात्र,
हे नाकारता येत नाही कोणाला,
बाबाला सोबत घेऊन आई साठी
छान प्लॅन करत राहतात.
दमलीस, जरा विश्रांती घेत जा! म्हणतात..
मुलं मोठी करताना आई कधी (मोठी)म्हातारी झाली
याची त्यांनाही खबर नसते..
ती मात्र हे बघताना
आनंदाने हळूच अश्रू पुसते!
साजरा होतो तिचा 'मदर्स डे'
गोड धोड खाण्यात..
ती मात्र आठवत राहते,
आपलं बाळ सोडून जाताना पाळण्यात.
