आई तुझी माया
आई तुझी माया
आई तुझी माया आता
पुन्हा एकदा कळू दे...
तुझ्या कुशीत मला जन्म
पुन्हा एकदा मिळू दे...
अजाणतेपणी मी तुला
दिला सतत, नित्य ‘दोष’
नेहमी बघ तुझ्यावरच
माझा असायचा 'रोष'
तुझ्या मिठीत येऊन
अश्रू मला ढाळू दे...
तुझ्या कुशीत मला जन्म
पुन्हा एकदा मिळू दे...
तुझी प्रत्येक 'भूमिका'
आज मला कळते आहे
म्हणूनच तुझी 'आठवण'
आता मला 'छळते' आहे
तुला बिलगताना माझा
भ्रम सारा गळू दे...
तुझ्या कुशीत मला जन्म
पुन्हा एकदा मिळू दे...
सारं उमजलंय मला आई
आता मन झालंय 'साफ'
माझी चूक पदरात घेऊन
मला करशील ना, गं 'माफ'?
माय लेकीचं आपलं नातं
पुन्हा नव्याने उजळू दे...
आई तुझी माया आता
पुन्हा एकदा कळू दे...
तुझ्या कुशीत मला जन्म
पुन्हा एकदा मिळू दे...
