पावन महाराष्ट्रभूमी
पावन महाराष्ट्रभूमी
जिज्ञासेने वाटे मना, या महाराष्ट्रा बघून घ्यावे
कडेकपारी डोंगररांगा, खिंडीघाटी फिरून यावे
कास पठारी जाऊनी एकदा, धुंद फुलांचे गंध घ्यावे
स्वराज्यभूच्या किल्ल्यांवरती, शिवरायांपुढती नत व्हावे
सह्याद्रीच्या उंच कडांवर, मनमोकळे फिरून यावे
ह्या देवांच्या पुण्यभूमीवर, संतजनांचे दर्शन घ्यावे
प्रत्येक दिसाच्या सायंकाळी, कोकणकिनारी हिंडून यावे
रात्री कोण्या बेटावरच्या, तंबूमध्ये निजून घ्यावे
उभ्या सवरल्या शिवारामध्ये, पुढली नवी सकाळ व्हावी
तीच जुनी मीठ भाकरी, दुपारच्या जेवणात यावी
घोड्यावरती टाप देऊनी, मैदाने सारी फिरून घ्यावी
वनवैभवाशी जोडून नाते, फळे वेगळी चाखून घ्यावी
आयुष्याच्या या सहलीचे, एक सुंदर गीत व्हावे
संगीतातल्या सप्तसुरांनी, पुन्हा पुन्हा गात राहावे
दोन क्षणांचे आयुष्य सारे, या वाटांवर गुंतून जावे
पुन्हा जन्मण्या महाराष्ट्रभूमीत, या भूमीशी नत व्हावे
