दुर्दैवी आखाजी
दुर्दैवी आखाजी
आला आखाजी चा सण
माहेरवासिनी आनंदा उधाण,
बंधू येतील माहेरी न्यावया ,
मिळेल सांजरी खावया ll1ll
सर्वत्र हर्षोल्लास,
मन माझे मात्र उदास,
आला आखाजी चा सण
हूरहुरले माझे मन,
लोचनी दाटले आसू
कुठे हरवले बंधूचे हसू ll2ll
मायबापाचे बघवत नाही हाल
रडून रडून डोळे त्यांचे लाल ,
नित्य वदती कोरोंना बनला काळ
हिरावला का आमचा बाळ ll3ll
थरथरती आजी-आजा
हाय रे दैवा काय दिलीस ही सजा,
आम्ही दिसलो नाही का तुझ्या डोळा
तरुणांना नेण्याची ही का वेळा? ll4ll
वहिनी हरवली दुःखाच्या सागरात
समजूत घालू कोणत्या शब्दात,
कशी जाऊ तिच्या पुढे
पाहून तिला काळीज माझे उड़े ll5ll
पप्पा आले का?आपण पाहू
मला आणतील खाऊ ,
रडत बिलगतो भाचा
बंद पडते माझी वाचा ll6ll
धाय मोकलून रडते तुझी सुता
काळाने का ओढून नेला पिता ,
कुठे शोधू मी आता
काय सांगू मी तिची व्यथा ll7ll
आखाजी स भरू तुझी घागर
बंधू माझा मायेचा सागर,
क्षणोक्षणी सार्या आठवणी,
कोण करेल माझी सासरी पाठवणी
अशी दुर्दैवी आखाजी
नको देवा कुणाच्या नशिबी......
नको देवा कुणाच्या नशिबी.....
