STORYMIRROR

प्रतिक्षा कदम

Others

3  

प्रतिक्षा कदम

Others

परी माझी रंगपेटीच हो रिती

परी माझी रंगपेटीच हो रिती

1 min
863

स्वप्न रेखीव, चित्र कोरीव, सारे निद्रेचे सोबती,

वास्तवात परी रेघोट्या नि आकारहीन ती नाती।

वाटले आज चितारावे स्वप्न जुळवून रंगसंगती, 

कुंचला मज हाती परी माझी रंगपेटीच हो रिती ।।

वाटले आज करावी मनीची वाट थोडी मोकळी,

भरुनी काढावी शब्दांनी अंतरीची मग पोकळी | 

शब्दकोशातील सारे आजच का मज पारखे होती? 

कुंचला मज हाती परी माझी रंगपेटीच हो रिती ।।

आज वाटले वाचा माझी असेल माझ्या साथीला,

कंठातून ती साद देईल मणी जपलेल्या पोथीला | 

स्वरानीही आज बंड पुकारले अशीच माझी स्थिती,

कुंचला मज हाती परी माझी रंगपेटीच हो रिती ।।

आजवर मजला कधीही आसवांनी ना दुखविले,

मैत्रीचे नाते आमुचे आजही तयांनी निभविले ।

जीवनाच्या मम प्रवासातील अश्रूच सच्चे सोबती,

कुंचला मज हाती परी माझी रंगपेटीच हो रिती ।।

Rate this content
Log in